मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच, तिरुअनंतपूरममध्ये दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा

Ind vs SA: टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच, तिरुअनंतपूरममध्ये दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा

सूर्यकुमार-राहुलची दमदार भागीदारी

सूर्यकुमार-राहुलची दमदार भागीदारी

Ind vs SA: भारतीय संघाला तिरुअनंतपूरममध्ये अवघं 107 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियानं हे लक्ष्य 17व्या ओव्हरमध्ये पार केलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

तिरुअनंतपूरम, 28 सप्टेंबर: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला विजयानं सुरुवात केली. तिरुअनंतपूरमच्या पहिल्या टी20त भारतानं पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला अवघं 107 धावांचं लक्ष्य मिळालं. टीम इंडियानं हे लक्ष्य 17व्या ओव्हरमध्ये पार केलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सूर्यकुमारचा पुन्हा तडाखा

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडला. 107 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्माला रबाडानं दोन बॉलमध्येच शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर विराट कोहलीलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. तोही 3 रन्स काढून बाद नॉकियाच्या बॉलिंगवर बाद झाला. पण फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलनं पुढे खेळाची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि संघाला विजयाकडे नेलं.

हेही वाचा - T20 World Cup: वर्ल्ड कप टीममधून आऊट पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत खेळणार हा खेळाडू

लोकेश राहुलनं बॉलर्सना अनुकूल असणाऱ्या पीचवर सुरुवातीला सावध खेळ केला. पण एकदा बॉलवर नजर स्थिरावल्यानंतर त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली आणि नाबाद अर्धशतक झळकावलं. त्यानं 56 बॉल्समध्ये नाबाद 51 रन्स केले. सूर्यानं मात्र खेळायला उतरताचं बॉलर्सवर हल्ला चढवला. त्यानं पहिल्या 5 पैकी दोन बॉल सिक्सरसाठी बाऊंड्री लाईनच्या पार पोहोचवले. त्यानंतर त्यानं 33 बॉल्समध्ये नाबाद 50 धावांची खेळी केली. त्याचं आंतरराष्ट्रीय टी20तलं हे आठवं अर्धशतक ठरलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

दक्षिण आफ्रिकेची दाणादाण

त्याआधी दीपक चहर आणि अर्शदीप सिंगनं दक्षिण आफ्रिला या सामन्यात सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं. दीपक चहरनं टीम इंडियासाठी नव्या बॉलनं सुरुवात केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकन कॅप्टनला शून्यावर माघारी धाडलं. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगनं कमाल केली.

आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अर्शदीपला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्याच सामन्यात खेळताना अर्शदीपनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली. त्यानं ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर क्विंटन डी कॉक, पाचव्या बॉलवर रुसो आणि सहाव्या बॉलवर डेव्हिड मिलरला माघारी धाडलं. यापैकी दोन बॅट्समन पहिल्याच बॉलवर आऊट झाले. रुसो आणि मिलर पहिल्याच बॉलवर माघारी परतले. मग तिसऱ्या ओव्हरमध्ये चहरनं ट्रिस्टन स्ट्रब्सला पहिल्याच बॉलवर आऊट करुन दक्षिण आफ्रिकेला पाचवा मोठा धक्का दिला. त्यावेळी 2.3 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 9 अशी अवस्था झाली होती.

पण त्या कठीण परिस्थितीतून केशव महाराज (41), एडन मार्करम (25) आणि वेन पार्नेलच्या (24) खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 106 धावांचा पल्ला गाठता आला. भारताकडून अर्शदीप सिंगनं 3, हर्षल पटेल आणि दीपक चहरनं प्रत्येकी 2 तर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket, T20 world cup 2022