Home /News /sport /

बापरे केवढी ती उंची! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार सगळ्यात उंच खेळाडू?

बापरे केवढी ती उंची! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार सगळ्यात उंच खेळाडू?

फोटो सौजन्य : ट्विटर

फोटो सौजन्य : ट्विटर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळणार आत्तापर्यंतचा सर्वाधिक उंची असणारा क्रिकेटपटू? देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू घेतोय कठोर मेहनत

    लाहोर, 9 ऑक्टोबर : बॉलिंग असो किंवा बॅटिंग, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक सुपरस्टार दिले आहेत. इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनुस, इंजमाम उल हक, सईद अन्वर, शोएब अख्तर यांच्या सारख्या दिग्गजांनी अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची चर्चा जशी चांगल्या गोष्टींमुळे होते, तशीच अनेकवेळा वादांमुळेही होते. यावेळी मात्र पाकिस्तानमधला 7 फूट 6 इंच उंचीचा खेळाडू चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. याआधी 7 फूट 1 इंच एवढी उंची असलेला मोहम्मद इरफान पाकिस्तानकडून खेळला आहे. 2010 साली मोहम्मद इरफान पाकिस्तानच्या टीममध्ये आला, पण त्याला कामगिरीमध्ये सातत्य दाखवता आलं नाही, त्यामुळे तो बरेच वेळा टीमच्या आत-बाहेर होता. एवढी मोठी उंची असल्यामुळे मोहम्मद इरफानने अनेक बॅट्समनना त्रास दिला. मोहम्मद इरफाननंतर आता मुदस्सर गुजर हा खेळाडू प्रकाशझोतात आला आहे. पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्याची इच्छा मुदस्सरने व्यक्त केली आहे. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार साज सादीक यांनी सोशल मीडियावर मुदस्सरचे फोटो शेयर केले आहेत. मुदस्सर याची उंची तब्बल 7 फूट 6 इंच एवढी आहे. तर तो 23.5 या साईजचे बूट घालतो. मुदस्सरने मागच्या वर्षी लाहोर कलंदर्सच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामला हजेरी लावली होती. जास्त उंची असल्यामुळे मुदस्सरच्या फिटनेसबाबत अडचणी आहेत, पण फिटनेस सुधारण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. फिटनेसमुळे कारकिर्द खराब होऊ नये, यासाठी तो मेहनत घेत आहे. पीएसएलवर टांगती तलवार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएल यांच्यात सध्या वाद सुरू आहे. पीएसएलच्या आर्थिक मॉडेलवरुन दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत. पीएसएल टीमच्या सहा फ्रॅन्चायजींनी टिकाऊ आर्थिक मॉडेल नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या आर्थिक मॉडेलमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कोट्यवधी रुपयांचा नफा झाला, पण टीम मात्र तोट्यात चालल्या आहेत, असा आरोप फ्रॅन्चायजींनी केला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे पीएसएलचा 2020 सालचा मोसम थांबवण्यात आला होता. या वादामुळे आता उरलेली स्पर्धा होणार का नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या