Home /News /sport /

T20 World Cup : हसरंगाची हॅट्रिक पाण्यात, मिलरने केलं 'लंका' दहन, दक्षिण आफ्रिकेचा रोमांचक विजय

T20 World Cup : हसरंगाची हॅट्रिक पाण्यात, मिलरने केलं 'लंका' दहन, दक्षिण आफ्रिकेचा रोमांचक विजय

डेव्हिड मिलरच्या (David Miller) आक्रमक बॅटिंगमुळे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर (South Africa vs Sri Lanka) रोमांचक विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) या सामन्यात हॅट्रिक घेतली.

    शारजाह, 30 ऑक्टोबर : डेव्हिड मिलरच्या (David Miller) आक्रमक बॅटिंगमुळे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर (South Africa vs Sri Lanka) रोमांचक विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) या सामन्यात हॅट्रिक घेतली, पण मिलरच्या खेळीमुळे हसरंगाची ही कामगिरी पाण्यात गेली. वानिंदु हसरंगाने 15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एडन मार्करमला आऊट केलं, यानंतर तो 18 व्या ओव्हरला बॉलिंगसाठी आला. पहिल्याच बॉलला त्याने टेम्बा बऊमाला आणि मग दुसऱ्या बॉलवर ड्वॅन प्रिटोरियसला आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता होती, तेव्हा मिलर आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांनी प्रत्येकी 1-1 सिक्स मारून आफ्रिकेला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने दिलेल्या 143 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या तीन विकेट 49 रनवरच गमावल्या, पण कर्णधार टेम्बा बऊमाने एका बाजूने किल्ला लढवला. 46 बॉलमध्ये 46 रन करून बऊमा आऊट झाला. यानंतर डेव्हिड मिलरने 13 बॉलमध्ये नाबाद 23 आणि कागिसो रबाडाने 7 बॉलमध्ये नाबाद 13 रन करून दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर दुष्मंता चमिराला 2 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकेच्या बॉलर्सनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 142 रनवर ऑल आऊट केलं. तबरेझ शम्सी आणि प्रिटोरियस यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर एनरिच नॉर्कियाला 2 विकेट मिळाल्या. पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा तीन मॅचमधला हा दुसरा विजय आहे, तर श्रीलंकेने तीनपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पहिल्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेशिवाय, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा समावेश आहे. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup

    पुढील बातम्या