दुबई, 8 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) प्रवास संपुष्टात आला आहे. अखेरच्या सुपर-12 सामन्यात नामिबियाचा पराभव करत भारताने शेवट गोड केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताचं सेमी फायनलला पोहोचणं आधीच कठीण झालं होतं. रविवारी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर भारताची सेमी फायनलला पोहोचण्याची शेवटची आशाही संपुष्टात आली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा (Virat Kohli) नामिबियाविरुद्धचा अखेरचा सामना होता. या टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार असल्याचं विराट कोहलीने आधीच सांगितलं होतं.
आपली अखेरची टी-20 खेळणाऱ्या विराट कोहलीने मोठं मन दाखवलं. कॅप्टन म्हणून शेवटची मॅच असूनही विराटने सूर्यकुमार यादवला (Suryamkumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल (KL Rahul) नाबाद राहिल्यामुळे विराट कोहलीला बॅटिंगला यायची संधी मिळाली नाही. मॅच संपल्यानंतर विराटने सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं कारण सांगितलं. 'सूर्यकुमारला या स्पर्धेत फार खेळण्याची संधी मिळाली नाही. एका मॅचनंतर त्याला दुखापत झाली, यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचं पुनरागमन झालं, पण त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. वर्ल्ड कपसारख्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेत खेळून जाणं ही सगळ्यात चांगली आठवण असते, त्यामुळे मी बॅटिंगसाठी मैदानात उतरलो नाही,' असं विराट म्हणाला.
नामिबायने दिलेल्या 133 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. केएल राहुल 36 बॉलमध्ये 54 रनवर नाबाद आणि सूर्यकुमार यादव 19 बॉलमध्ये 25 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) 37 बॉलमध्ये 56 रन करून आऊट झाला. या सामन्यात टीम इंडियाने नामिबियाला 132 रनवर रोखलं. आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराहला दोन विकेट घेण्यात यश आलं. नामिबियाकडून डेव्हिड वीजने सर्वाधिक 26 रन केले. ओपनर स्टीफन बार्ड 21 रन करून आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suryakumar yadav, T20 world cup, Team india, Virat kohli