दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाकिस्तानच्या (India vs Pakistan) टीमला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa vs Pakistan Practice Match) सराव सामन्यात पाकिस्तानचा अखेरच्या बॉलवर पराभव झाला आहे. पाकिस्तानने दिलेलं 187 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने रस्सी व्हॅन डर डुसेनच्या (Rassie Van Der Dussen) वादळी शतकाच्या जोरावर पार केलं. आफ्रिकेला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 रनची गरज होती. तेव्हा डुसेन आणि डेव्हिड मिलर (David Miller) यांनी हसन अलीच्या (Hasan Ali) बॉलिंगवर आक्रमण केलं. डुसेन 51 बॉलमध्ये 101 रनवर नाबाद राहिला, तर टेंबा बऊमाने 42 बॉलमध्ये 46 रन केले. पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि शाहीन आफ्रिदीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
दक्षिण आफ्रिकेने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केले. फखर झमानने (Fakhar Zaman) 28 बॉलमध्ये 52 रन केले, यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. असीफ अलीने 18 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली.
पाकिस्तानचा हा दुसरा सराव सामना होता, याआधी त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. हे सराव सामने आता संपले असून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानचा पहिलाच सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पराभव म्हणजे पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. दुसरीकडे भारतीय टीमने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सराव सामने जिंकले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, South africa, T20 world cup