अबु धाबी, 10 नोव्हेंबर : न्यूझीलंड आणि इंग्लंड (England vs New Zealand) यांच्यामध्ये आज टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup Semi Final) पहिली सेमी फायनल खेळवली जाणार आहे. या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक ट्वीट करत अंपायर कुमार धर्मसेनाला (Kumar Dharmasena) ट्रोल केलं आहे. 2019 वनडे वर्ल्ड कपची फायनल न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्येच झाली होती. तेव्हाही कुमार धर्मसेना अंपायर होते. धर्मसेना यांनी केलेल्या एका चुकीचा फटका न्यूझीलंडला बसला आणि इंग्लंडचा नाट्यमयरित्या विजय झाला.
वसीम जाफरन टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलआधी कुमार धर्मसेना यांचा एक फोटो शेयर केला. 'अरे कुमार, आज मॅच किती वाजता सुरू होईल?' असं कॅप्शन वसीम जाफरने या फोटोला दिलं. या फोटोमध्ये कुमार धर्मसेना 6 रनचा इशारा करताना दिसत आहेत. धर्मसेना यांचा हा फोटो इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे वर्ल्ड कप फायनलचाच आहे. धर्मसेना अंपायर असताना त्यांनी इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) ओव्हर थ्रोचे चार रन दिले, यानंतर मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.
इंग्लंड आणि न्यूझीलंडचा स्कोअर निर्धारित ओव्हरनंतर बरोबरीत 241 रनवर राहिला. यानंतर दोन्ही टीममध्ये सुपर ओव्हर झाली, पण सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर सर्वाधिक बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. बेन स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. स्टोक्सने फायनलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली होती. आता टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलकडे वनडे वर्ल्ड कप फायनलचा एक्शन रिप्ले म्हणून बघितलं जात आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडने सुपर-12 स्टेजमध्ये 5 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत.
इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केला, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या लीग मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर केन विलियमसनच्या न्यूझीलंडने सुपर-12 स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर लागोपाठ चार मॅच जिंकल्या. न्यूझीलंडने भारत, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup