अबु धाबी, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडने इंग्लंडवर (England vs New Zealand) 5 विकेटने रोमांचक विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) डेवॉन कॉनवेसोबत (Devon Conway) पार्टनरशीप करून न्यूझीलंडला सावरलं. मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला, तर कॉनवे 46 रनवर आऊट झाला. कॉनवेची विकेट गेल्यानंतर इंग्लंडची टीम पुनरागमन करेल असं वाटत होतं, पण जेम्स नीशमने (James Neesham) आक्रमण केलं. नीशमने 11 बॉलमध्ये 27 रन केले, यामध्ये 3 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. इंग्लंडकडून क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर आदिल रशीदला एक विकेट घेण्यात यश आलं.
14 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या दोन टीममध्ये गुरुवारी दुसरी सेमी फायनल रंगणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) इंग्लंडने न्यूझीलंडला (England vs New Zealand) विजयासाठी 167 रनचं आव्हान दिलं. मोईन अलीच्या अर्धशतकामुळे इंग्लंडला 166/4 पर्यंत मजल मारता आली. मोईन अलीने 37 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. मोईनच्या या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डेव्हिड मलाननेही 41 रन केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, एडम मिल्ने, ईश सोढी आणि एडम मिल्ने यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण इंग्लंडच्या टीमला मात्र बदल करावा लागला आहे. इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय (Jason Roy) याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे, तर फास्ट बॉलर टायमल मिल्सही (Tymal Mills) दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
इंग्लंड आणि न्यूझीलंडने सुपर-12 स्टेजमध्ये 5 पैकी 4 मॅच जिंकल्या होत्या. इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केला, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या लीग मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर केन विलियमसनच्या न्यूझीलंडने सुपर-12 स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर लागोपाठ चार मॅच जिंकल्या. न्यूझीलंडने भारत, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला.
याआधी 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम आमने-सामने होत्या, त्यावेळीही रोमांचक मुकाबला झाला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंडचा स्कोअर निर्धारित ओव्हरनंतर बरोबरीत 241 रनवर राहिला. यानंतर दोन्ही टीममध्ये सुपर ओव्हर झाली, पण सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर सर्वाधिक बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. आता टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने वनडे वर्ल्ड कपच्या पराभवाचा बदला घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup