शारजाह, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) रोमांच आता आणखी वाढला आहे. सुपर-12 राऊंडच्या अखेरच्या काही मॅच सुरू झाल्या असल्या तरी अजूनही सेमी फायनलच्या (Semi Final Equation) चारही टीम निश्चित झाल्या नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (South Africa vs England) यांच्यातल्या सामन्याने तर सेमी फायनलची रेस आणखी बिकट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 190 रनचं आव्हान दिलं आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी जर इंग्लंडला 130 रनवर रोखलं तर त्यांचा सेमी फायनलचा प्रवेश निश्चित होईल आणि ऑस्ट्रेलिया या रेसमधून बाहेर जाईल. तसंच दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 86 रनवर रोखलं तर इंग्लंडला सेमी फायनल गाठता येणार नाही. पहिल्या ग्रुपमध्ये सेमी फायनलला पोहोचण्यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात स्पर्धा आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने सुरुवातीलाच रिझा हेन्ड्रिक्सला 2 रनवर आऊट करून दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर रस्सी व्हॅन डर डुसेनने क्विंटन डिकॉक आणि मग एडन मार्करमच्या साथीने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रस्सी व्हॅन डर डुसेनने 60 बॉलमध्ये नाबाद 94 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 6 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता. एडन मार्करमने 25 बॉलमध्ये 52 रन केले. मार्करमने 4 सिक्स आणि 2 फोर मारले. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
सेमी फायनलचं गणीत
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवल्यामुळे सेमी फायनलचं गणीत किचकट झालं आहे. सेमी फायनलला पोहचण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्धच्या (South Africa vs England) सामन्यात मोठा विजय मिळवावा लागणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजच्या शेवटच्या काही मॅच शिल्लक आहेत, पण फक्त पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश झाला आहे. पहिल्या ग्रुपमधून सेमी फायनलच्या दोन जागांसाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनलच्या एका जागेसाठी रेस आहे. रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड-अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर भारताचं आव्हान रविवारीच संपुष्टात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup