दुबई, 6 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) सुरुवात निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला धूळ चारली. या दोन्ही सामन्यांमध्ये मोठा विजय मिळाला असला, तरी टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि मग भारताने नामिबियाविरुद्ध विजय मिळवला, तरच टीम इंडियासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडतील.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित झाले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोहम्मद शमीचं (Mohammad Shami) उदाहरण दिलं आहे. शमी टेस्ट क्रिकेटसाठी उपयुक्त आहे, पण टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा चांगले बॉलर भारताकडे आहेत, असं मांजरेकर म्हणाले. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला संघर्ष करावा लागला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध शमीला एकही विकेट मिळाली नाही, यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध त्याला 3-3 विकेट मिळाल्या.
दफा न्यूजशी बोलताना मांजरेकर म्हणाले, 'भारताने आपल्या टी-20 टीमकडे बघण्याची वेळ आली आहे. काही खेळाडूंकडे पाहावं आणि ते क्रिकेटच्या दुसऱ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी अनुकूल आहेत का, याचं आकलन करावं. क्रिकेटच्या एका फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम असणारे खेळाडू क्रिकेटच्या दुसऱ्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम असतीलच असं नाही.' संजय मांजरेकर यांनी या यादीत आर.अश्विनच्या (R Ashwin) नावाचही समावेश केला.
'मोहम्मद शमी टेस्ट क्रिकेटमध्ये टीमची संपत्ती आहे. मी मागच्यावेळी त्याला बघितलं तेव्हा टी-20 क्रिकेटमधला त्याचा इकोनॉमी रेट 9 चा होता. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने चांगली बॉलिंग केली, हे मला माहिती आहे. पण भारताकडे टी-20 क्रिकेटमध्ये शमीपेक्षा चांगले बॉलर नक्कीच आहेत,' असं वक्तव्य मांजरेकरांनी केलं.
मोहम्मद शमीने टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून 16 सामने खेळले, यात त्याने 29.38 ची सरासरी आणि 9.53 च्या इकोनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या 4 सामन्यांमध्ये शमीने 6 विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला 9.74 च्या इकोनॉमी रेटने 3 विकेट पटकावल्या, तर स्कॉटलंडविरुद्ध 5 च्या इकोनॉमी रेटने त्याला 3 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india