मुंबई, 9 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला धूळ चारली, पण तरीही भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. टीम इंडियाच्या या खराब कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं, तर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळही वर्ल्ड कपनंतर संपला आहे. रवी शास्त्री यांच्याऐवजी राहुल द्रविडची (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, पण कॅप्टनची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.
17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे, त्यामुळे लवकरच टी-20 टीमच्या नव्या कॅप्टनची घोषणा केली जाईल. विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टी-20 टीमचं नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या नामिबियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनेही रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व दिलं जाईल, असे संकेत दिले होते. रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर सध्याच्या टीममधल्या पाच खेळाडूंना बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे.
वरुण चक्रवर्ती
मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख मिळवलेल्या वरुण चक्रवर्तीची (Varun Chakravarthy) आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरीनंतर टीम इंडियात निवड करण्यात आली, पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये वरुण चक्रवर्ती सपशेल अपयशी ठरला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये वरुणला एकही विकेट मिळवता आली नाही. तसंच वरुण चक्रवर्तीच्या फिटनेसचीही समस्या आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधून वरुणला बाहेर काढलं जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
हार्दिक पांड्या
वरुणप्रमाणेच टीम इंडियाने हार्दिक पांड्यावरही (Hardik Pandya) विश्वास दाखवला होता, पण हार्दिकनेही निराशा केली. टी-20 वर्ल्ड कपच्या आधीपासूनच हार्दिकच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. ऑलराऊंडर म्हणून निवड झालेल्या हार्दिकने आयपीएलमध्ये बॉलिंग केली नव्हती, तसंच तो बॅटिंगमध्येही फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे हार्दिकच्या निवडीवर टीका करण्यात आली. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी हार्दिकचं टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे.
भुवनेश्वर कुमार
वरुण आणि हार्दिकप्रमाणेच भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) फिटनेसची समस्या असताना त्याचीही टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली. सुरुवातीच्या सामन्यातल्या खराब कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारला टी-20 वर्ल्ड कपमधल्या नंतरच्या सामन्यांमध्ये संधी देण्यात आली नाही. तसंच आयपीएलमध्येही भुवनेश्वर संघर्ष करताना दिसला. 2019 वर्ल्ड कपनंतर भुवनेश्वरला सातत्याने फिटनेसच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध भुवनेश्वरऐवजी नवोदित फास्ट बॉलरला खेळवलं जाऊ शकतं.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमीने (Mohammad Shami) अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विकेट घेतल्या असल्या तरी त्याचा इकोनॉमी रेट 10 रन प्रती ओव्हरच्या घरात आहे. शमीचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमला इकोनॉमी रेटही तेवढाच आहे, त्यामुळे शमीचीही टी-20 टीममधून गच्छंती होऊ शकते.
ईशान किशन
ईशान किशनला (Ishan Kishan) खराब फॉर्ममुळे आयपीएलच्या काही सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली, पण ईशानने टीममध्ये धमाकेदार पुनरागमन केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ईशान किशनला एकच सामना खेळायला मिळाला, पण यात तो अपयशी ठरला. टीममध्ये सध्या ऋषभ पंत आणि केएल राहुल हे दोन विकेट कीपिंग करू शकतात, त्यामुळे ईशान किशनचा पत्ता कट होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, T20 world cup, Team india, Virat kohli