मुंबई, 10 ऑगस्ट : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू व्हायला अजून 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सगळ्या टीम जोरदार तयारी करत आहेत, पण न्यूझीलंडने (New Zealand) थेट टीमचीच घोषणा केली आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल. यासाठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. केन विलियमसन (Kane Williamson) किवी टीमचा कर्णधार आहे. विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडची टीम 2019 वर्ल्ड कपच्या (World Cup 2019) फायनलमध्ये पोहोचली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही (WTC Final) त्यांचा विजय झाला होता.
किवी टीममध्ये एडम मिल्नेला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. गेल्या काही काळापासून धमाकेदार कामगिरी करणाऱ्या डेवॉन कॉनवे आणि मार्क कॅम्पेन यांनाही निवडण्यात आलं आहे. मार्टिन गप्टील आणि टीम सायफर्टमुळे किवी टीमची बॅटिंग आणखी मजबूत झाली आहे. रॉस टेलर, कॉलीन डि ग्रॅण्डहोम आणि फिन एलन यांना बाहेर करण्यात आलं आहे. पण 34 वर्षांचा लेग स्पिनर टॉड एस्टल याला इश सोदी आणि मिचेल सॅन्टनर या दोन स्पिनरबरोबर निवडण्यात आलं आहे.
न्यूझीलंडच्या टीममध्ये 4 फास्ट बॉलर आहेत, यामध्ये ट्रेन्ट बोल्ट, टीम साऊदी, काईल जेमिसन आणि लॉकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. साऊदी सोडून इतर तीनही फास्ट बॉलर्सकडे आयपीएलमध्ये सराव करण्याची संधी आहे. बोल्ट मुंबई इंडियन्समध्ये, जेमिसन बँगलोर आणि फर्ग्युसन कोलकात्याच्या टीममध्ये आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन, टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिचल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, एडम मिल्ने
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, T20 world cup