अबु धाबी, 27 ऑक्टोबर : नामिबियाचा फास्ट बॉलर रुबेन ट्रम्पलमॅनने (Ruben Trumpelmann) बुधवारी टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवला आहे. स्कॉटलंडविरुद्ध (Scotland vs Namibia) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियममधल्या सामन्यात रुबेनने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या ओव्हरमध्ये एखाद्या बॉलरने तीन विकेट घेतल्या. सुपर-12 च्या या सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरासमसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेच्या डरबनमध्ये जन्मलेल्या रुबेनने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जॉर्ज मुन्सेला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर त्याने पुढचा बॉल वाईड टाकला. यानंतरच्या बॉलवर एकही रन आली नाही, पुढचा बॉलही त्याने वाईड टाकला. तिसऱ्या वैध बॉलवर कॅलम मॅकलियोड शून्य रनवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतरच्या बॉलवर रिची बेरिंग्टनही शून्य रनवरच एलबीडब्ल्यू झाला. ट्रम्पलमॅनच्या या कामगिरीमुळे स्कॉटलंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 109 रन करता आल्या.
23 वर्षांच्या रुबेनने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. रुबेनच्या करियरमधली ही सहावी आंतरराष्ट्रीय मॅच आहे. याआधीच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 41 विकेट आहेत. याशिवाय रुबेनने 10 लिस्ट ए आणि 9 टी-20 मॅचही खेळल्या. लिस्ट एमध्ये त्याला 11 आणि टी-20 मॅचमध्ये 10 विकेट मिळाल्या.
स्कॉटलंडने ग्रुप-बीच्या आपल्या तिन्ही मॅचमध्ये विजय मिळवत सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवला होता, तर नामिबियाने ग्रुप-एमधून सुपर-12 गाठली आहे. नामिबियाला लीग स्टेजमध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकता आल्या. रुबेनला लीग स्टेजच्या तीन मॅचमध्ये केवळ एकच विकेट मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup