शारजाह, 5 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न अत्यंत धूसर झालं आहे. विराटच्या टीमला आता स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. याचसोबत त्यांना न्यूझीलंडच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
न्यूझीलंड आणि नामिबिया (New Zealand vs Namibia) यांच्यातल्या सामन्यावेळी काही काळ टीम इंडिया आणि चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण अखेरच्या 4 ओव्हरने भारताच्या स्वप्नांना मोठा धक्का दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर नामिबियाच्या बॉलर्सनी किवी बॅटरना रोखून धरलं. 16 ओव्हरमध्ये न्यूझीलंडची अवस्था 96/4 अशी होती, पण ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) आणि जेम्स नीशम (James Neesham) यांच्या जोडीने किवी टीमला अडचणीतून बाहेर काढलं.
ग्लेन फिलिप्सने 21 बॉलमध्ये नाबाद 39 आणि जेम्स नीशमने 23 बॉलमध्ये नाबाद 35 रन केले. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये फिलिप्स आणि नीशमच्या जोडीने तब्बल 67 रन कुटले. न्यूझीलंडने 17 व्या ओव्हरला 14 रन, 18व्या ओव्हरला 21 रन, 19व्या ओव्हरला 14 रन आणि 20 व्या ओव्हरला 18 रन काढले. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टील 18 रनवर डॅरेल मिचेल 19 रनवर, केन विलियमसन 28 रनवर आणि कॉनवे 17 रनवर आऊट झाले. याआधी स्कॉटलंडनेही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरपर्यंत लढत दिली होती, पण मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका त्यांना महागात पडल्या. स्कॉटलंडविरुद्ध मार्टिन गप्टील न्यूझीलंडच्या मदतीला धावला, तर या सामन्यात नीशम आणि फिलिप्सने किवी टीमला अडचणीतून बाहेर काढलं.
T20 World Cup : मार्टिन गप्टील पुन्हा झाला टीम इंडियाचा 'व्हिलन', दुसऱ्यांदा मोडणार भारताचं स्वप्न!
सेमी फायनलचं समीकरण
टीम इंडियाचे उरलेले सामने स्कॉटलंड (Scotland) आणि नामिबियाविरुद्ध (Namibia) आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला. या दोन्ही मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट खराब झाला, पण अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने विजय झाल्यामुळे भारताचा नेट रनरेट सुधारला. असं असलं तरी टीम इंडियाला उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारताने पहिले बॅटिंग केली तर त्यांना कमीत कमी 60-70 रनने विजय मिळवावा लागेल. तसंच आव्हानाचा पाठलाग कमीत कमी विकेट गमावून आणि कमीत ओव्हरमध्ये करावा लागेल.
अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं आणि भारताने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या, तर तिन्ही टीमच्या खात्यात प्रत्येकी 6-6 पॉईंट्स असतील, त्यामुळे ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल.
T20 World Cup : फक्त ही दोन कामं झाली तर टीम इंडिया पोहोचणार सेमी फायनलमध्ये!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india