अबु धाबी, 27 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा खेळाडू दुसऱ्यांचे शॉट कॉपी करण्याचा प्रयत्न करतात, पण यामध्ये त्यांचंच हसं होतं. श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू तिलकरत्ने दिलशान (Tilakratne Dilshan) याचा स्कूप शॉट बराच लोकप्रिय झाला. असाच शॉट विराट कोहली, इंग्लंडचा जेसन रॉय आणि एमएस धोनीही मारतात. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) बांगलादेशचा बॅटर मेहेदी हसन (Mehedi Hasan) यानेही असाच शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तो कॅच आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा (England vs Bangladesh) कर्णधार महमदुल्लाहने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण टीमला खास कामगिरी करता आली नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 124 रन केले. मुशफिकुर रहिमने 30 बॉलमध्ये 24 रनची खेळी केली, यामध्ये 3 फोरचा समावेश होता. इंग्लंडच्या टायमल मिल्सने 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या.
मिल्सने मेहेदी हसनची विकेट घेतली. स्कूप शॉट खेळायच्या नादात तो आऊट झाला. इनिंगच्या 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला मेहेदीने स्कूप शॉट मारून बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या क्रिस वोक्सने त्याचा कॅच पकडला. मेहेदी हसनने 10 बॉलच्या आपल्या खेळीमध्ये 2 फोर मारले.
View this post on Instagram
हा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, तसंच यूजर्सनी मेहेदी हसनला या शॉटवरून ट्रोलही केलं. मिल्सच्या 3 विकेटशिवाय लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या आणि क्रिस वोक्सला एक विकेट घेण्यात यश आलं.
बांगलादेशने दिलेलं 125 रनचं आव्हान इंग्लंडने फक्त 14.1 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं. जेसन रॉयने (Jason Roy) 38 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली, त्याच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. डेव्हिड मलानने नाबाद 28, जॉस बटलरने 18 आणि जॉनी बेयरस्टोने नाबाद 8 रनची खेळी केली.
सलग दोन विजय मिळाल्यामुळे इंग्लंडची टीम पहिल्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये आता पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासह त्यांचा नेट रनरेटही तब्बल +3.614 एवढा झाला आहे. इंग्लंडचे उरलेले सामने आता श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्ये 6-6 टीमचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. दोन्ही ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.