नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजच्या मुकाबल्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. टीम इंडियाच्या निराशजनक कामगिरीनंतर क्रिकेट जगतात सध्या एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंपायर रिचर्ड केटलब्रॉ यांची. केटलब्रॉ हे टीम इंडियासोबत जेव्हा जेव्हा मैदानात उभे असतात तेव्हा टीम इंडियाचा पराभव (richard kettleborough) हा होतोच. त्यामुळे अंपायर रिचर्ड केटलब्रॉ हे टीम इंडियासाठी पनौती ठरत आहेत असा तर्क क्रिकेटप्रेमी लावत आहेत.
टीम इंडियाने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत आयसीसीच्या नॉकआऊट (बाद फेरी) सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु त्यांना जेतेपद पटकावता आले नाहीये. यामागील प्रमुख कारण अंपायर रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रिचर्ड केटलब्रॉ यांनी भारतीय संघाच्या अनेक नॉकआऊट सामन्यात पंचगिरी केली आहे, ज्यामध्ये भारतीय संघाला अखेरच्या क्षणी विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
2014 पासून जेव्हा जेव्हा भारतीय संघाने आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांचे नॉकआऊट सामने खेळले आहेत, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलब्रॉ हे अंपायर होते. भारतीय संघाने 2014 मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने त्यांना पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात देखील रिचर्ड केटलब्रॉ हे अंपायर होते. त्यांनतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
इतकेच नव्हे तर रिचर्ड केटलब्रॉ हे अंपायर असताना भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात, पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या सर्व महत्त्वांच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियासाठी अंपायर रिचर्ड केटलब्रॉ पनौती ठरले आहेत.
रिचर्ड केटलब्रॉ अंपायर असलेल्या दर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० वर्ल्ड कप सामन्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. पंच रिचर्ड केटलब्रॉ यांच्या उपस्थितीत भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा मन तुटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup