• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup : शेवटच्या स्पर्धेतही 'कॅप्टन' कोहलीने तेच केलं, विराटच्या 10 घोडचुकांनी टीम इंडियाचा घात!

T20 World Cup : शेवटच्या स्पर्धेतही 'कॅप्टन' कोहलीने तेच केलं, विराटच्या 10 घोडचुकांनी टीम इंडियाचा घात!

युएईमध्ये सुरू असलेला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) विराट कोहलीची (Virat Kohli Mistakes) कॅप्टन म्हणून अखेरची स्पर्धा आहे. विराटची कॅप्टन म्हणून ही अखेरची स्पर्धा असली तरी त्याने या स्पर्धेतही त्याच चुकांची पुनरावृत्ती केली आहे.

  • Share this:
    दुबई, 31 ऑक्टोबर : युएईमध्ये सुरू असलेला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) विराट कोहलीची (Virat Kohli Mistakes) कॅप्टन म्हणून अखेरची स्पर्धा आहे. यानंतर आपण टी-20 फॉरमॅटमध्ये टीमचं नेतृत्व करणार नसल्यांच विराटने आधीच स्पष्ट केलं. विराटची कॅप्टन म्हणून ही अखेरची स्पर्धा असली तरी त्याने या स्पर्धेतही त्याच चुकांची पुनरावृत्ती केली आहे. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) ईशान किशन केएल राहुलसोबत ओपनिंगला बॅटिंगसाठी आला. हे दोघं बॅटिंगसाठी मैदानात येत असल्याचं बघून कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. कारण इशान किशन मॅचच्या 17 व्या बॉलला 4 रन करून आऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4 शतकं आहेत. ही चारही शतकं रोहितने ओपनिंगला खेळून केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. एवढं शानदार रेकॉर्ड असतानाही विराटने ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2o17 Champions Trophy Final) ही विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची पहिलीच टेस्ट होती. पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) या हाय व्होल्टेज सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. एवढा मोठा तणाव असलेल्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा विराटचा हा निर्णय अनेकांना रुचला नाही. या सामन्यात पाकिस्तानने 338 रनचा मोठा स्कोअर उभारला. मोठ्या स्कोअरच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या दबावात भारताचा फक्त 158 रनने ऑल आऊट झाला आणि पाकिस्तानने हा सामना 180 रनने जिंकला. अनिल कुंबळेसोबत वाद याच सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यात वाद झाले, अखेर अनिल कुंबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले. 2019 वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाचा गोंधळ 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली, पण संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारताला चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनमुळे अडचणीचा सामना करावा लागला. वर्ल्ड कपच्या बराच काळ आधीपासूनच ही समस्या समोर दिसत असली तरी त्यावर कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकर 2019 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवरूनही बराच वाद पाहायला मिळाला. वर्ल्ड कपआधी बराच काळ अंबाती रायुडू (Ambati Rayudu) टीम इंडियामध्ये होता, पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये रायुडूची निवड झाली नाही. रायुडूऐवजी विजय शंकर (Vijay Shankar) याला टीममध्ये संधी देण्यात आली. यानंतर रायुडूने नाराजी व्यक्त करत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर काही मॅच खेळला, पण दुखापतीनंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. यानंतर त्याचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं नाही. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्यासारखी विजय शंकरची प्रतिभा होती, तर मग तो त्यानंतर पुन्हा भारतीय टीममध्ये का दिसला नाही? एवढच नाही तर आयपीएलमध्ये हैदराबादची टीमही त्याला सगळ्या मॅच खेळवत नाही. मग टीम इंडियाला विजय शंकरमध्ये नक्की कोणती प्रतिभा दिसली, असा प्रश्नही उपस्थित होतो. स्पिनर जोडीवरून यू-टर्न 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना टीमबाहेर केलं, पण आता पुन्हा एकदा टीमची भूमिका 360 डिग्रीमध्ये बदलली आहे. अश्विन आणि जडेजाला बाहेर केल्यानंतर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना टीममध्ये घेण्यात आलं. या दोघांनी पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला अनेक विजय मिळवून दिले, पण आता परत टीमने जडेजा आणि अश्विनवर विश्वास दाखवला आहे. अश्विनचं 4 वर्षांनंतर भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विन खेळणार आहे. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एमएस धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. धोनीआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या बॅटिंगला उतरले. टीम इंडिया तणावात असताना एमएस धोनीसारखा शांत खेळाडू वरच्या क्रमांकावर खेळणं गरजेचं होतं. तसंच करियरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या धोनीला मैदानात सेट व्हायला देखील वेळ लागत होता हेदेखील दिसून आलं होतं. तरीदेखील सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर खेळला. या सामन्यात धोनीने 69.44 च्या स्ट्राईक रेटने 72 बॉलमध्ये 50 रन केले. भारताचा या सामन्यात 18 रनने पराभव झाला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. लॉर्ड्स टेस्टमध्ये कुलदीपला खेळवणं 2018 साली इंग्लंड दौऱ्यातल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये ढगाळ वातावरण आणि हिरवी खेळपट्टी असतानाही विराट कोहलीने स्पिनर असलेल्या कुलदीप यादवला 11 खेळाडूंमध्ये स्थान दिलं. इंग्लंड दौऱ्यात पुजाराला डच्चू 2018 सालच्याच इंग्लंड दौऱ्यातल्या एका टेस्टमध्ये विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराला टीमबाहेर बसवलं होतं. टेस्ट स्पेशलिस्ट असलेल्या पुजाराला टेस्ट टीममधूनच काढल्यानंतर विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. अश्विन बेंचवरच टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनची टीममध्ये निवड करण्यात आली. 5 वर्षांनंतर अश्विनने भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन केलं, पण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अश्विनला खेळवण्यात आलं नाही. इंग्लंड दौऱ्यातही टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनला चारही टेस्टमध्ये बेंचवरच बसावं लागलं, यावरूनही विराटच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
    Published by:Shreyas
    First published: