दुबई, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पहिले पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने हरवल्यानंतर रविवारी न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या दोन पराभवांमुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न जवळपास भंगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची मॅच संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पराभवाचं कारण सांगितलं, पण भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी मात्र विराट कोहलीच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला होता विराट?
'हे खूप विचित्र आहे. या सामन्यात आम्ही धाडसी नव्हतो, आम्ही बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल दाखवू शकलो नाही. आम्ही जास्त रन काढले नाहीत. तसंच ते वाचवण्याची धडाडी देखील दाखवली नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट टीमकडून क्रिकेट खेळता तेव्हा फक्त फॅन्सची नाही तर अन्य खेळाडूंचीही मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षा नेहमी राहणार. आम्ही इतक्यावर्षांपासून हे सर्व अनुभवलं आहे. भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते सहन करां लागतं. तुम्ही एक टीम म्हणून खेळता तेव्हा या अपेक्षांचा दबाव जाणवत नाही. पण, मागच्या दोन मॅचमध्ये तसं झालं नाही,' हे विराटनं मान्य केलं.
विराट कोहलीच्या आम्ही धाडसी नव्हतो या वक्तव्यावर कपिल देव यांनी टीका केली. कपिल देव एबीपी न्यूजसोबत बोलत होते. विराट कोहलीचा स्वभाव तसा नाही, पण मग तरी त्याने असं कमकूवत वक्तव्य केलं. तो लढाऊ आहे. आम्ही धाडसी नव्हतो, असं वक्तव्य कॅप्टनने करू नये. तुम्ही देशासाठी खेळत आहात. जेव्हा तुम्ही अशी वक्तव्य करता तेव्हा तुमच्यावर टीका करण्यात येईल, असं कपिल देव म्हणाले.
'टीम इंडियाच्या या कामगिरीवर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. टीका करायलाही शब्द कमी पडतील. आयपीएलमुळे आमचा सराव झाला आहे, असं खेळाडू म्हणतात. पण जेव्हा तुम्ही अशी कामगिरी करता तेव्हा तुमच्यावर टीका होणारच आहे. जेव्हा तुम्ही चांगले खेळता तेव्हा कौतुकही तेवढंच होतं. तुम्ही मैदानात लढता तेव्हा काही वेळा तुमचा विजय होतो, तर काहीवेळा पराभवाला सामोरं जावं लागतं. पण या सामन्यात एकानेही अशी कामगिरी केली नाही, ज्यामुळे आनंदी वाटेल,' असं वक्तव्य कपिल देव यांनी केलं.
भारताचं भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती?
भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india, Virat kohli