• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup IND vs PAK : तब्बल 9 वर्ष... विराटची विकेट घ्यायला पाकिस्तानला लागला एवढा वेळ!

T20 World Cup IND vs PAK : तब्बल 9 वर्ष... विराटची विकेट घ्यायला पाकिस्तानला लागला एवढा वेळ!

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सामन्यात भारताचा (India vs Pakistan) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाची लाज वाचवली आहे.

 • Share this:
  दुबई, 24 ऑक्टोबर : पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सामन्यात भारताचा (India vs Pakistan) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाची लाज वाचवली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोन्ही ओपनर स्वस्तात आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) साथीने भारताच्या इनिंगला आकार दिला. विराटने 49 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. यामध्ये 5 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये 53 रनची पार्टनरशीप झाली. ऋषभ पंत 30 बॉलमध्ये 39 रन करून आऊट झाला. विराट कोहलीच्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध आऊट झाला आहे. 2012 साली विराट पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपची मॅच खेळला होता. यानंतर 2014 वर्ल्ड कप, 2016 वर्ल्ड कप आणि आता 2021 वर्ल्ड कपमध्ये विराट पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला. याआधीच्या वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराट नाबाद राहिला होता. 2012 साली कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात विराटने 61 बॉलमध्ये नाबाद 78 रनची खेळी केली होती. यानंतर 2014 साली विराट 32 बॉलमध्ये 36 रनवर नाबाद राहिला. 2016 साली कोलकात्यात झालेल्या मॅचमध्ये विराटने 37 बॉलमध्ये नाबाद 57 रन केले होते. यानंतर आता दुबईमध्ये झालेल्या सामन्यात अखेर विराट आऊट झाला. विराटची विकेट घ्यायला पाकिस्तानला तब्बल 9 वर्ष लागली. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एका टीमविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता विराटच्या नावावर पाकिस्तानविरुद्ध 226 रन झाल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एका टीमविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल (Chris Gayle) पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 274 रन केले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान (Tilakratne Dilshan) आहे. दिलशानने वेस्ट इंडिजविरुद्ध 238 रन केले. महेला जयवर्धनेच्या (Mahela Jayawardene) नावावर न्यूझीलंडविरुद्ध 226 रन आहेत. महेलाप्रमाणेच विराटनेही पाकिस्तानविरुद्ध 226 रनच केल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. विराट कोहलीने आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये 10 अर्धशतकं केली आहेत. त्याच्या खालोखाल क्रिस गेलच्या नावावर 9 आणि महेला जयवर्धनेच्या नावावर 7 अर्धशतकं आहेत.
  Published by:Shreyas
  First published: