मुंबई, 8 नोव्हेंबर : टीम इंडियाची (Team India) 8 वर्षांपासूनची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे. रविवारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर (NZ vs AFG) विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधून (ICC T20 World Cup 2021) बाहेर झाली. भारताने 4 मॅचमध्ये 2 विजय मिळवले, तर न्यूझीलंडला 4 आणि पाकिस्तानला 5 विजय मिळाले, त्यामुळे या दोन टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाल्या. अफगाणिस्तानने जर न्यूझीलंडचा पराभव केला असता तर भारतासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडले असते.
टी-20 वर्ल्ड कपनंतर आता भारतीय टीममध्ये बदल होणार आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) वर्ल्ड कपआधीच आपण टी-20 फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळही सोमवारच्या मॅचनंतर संपणार आहे. रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होणार आहे. याचसह टीमचे बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग कोचही बदलला जाणार आहे.
टीम इंडियामध्ये हे नवीन पर्व सुरू होण्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची जोडी भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देईल, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे. विराटच्या जागी टीम इंडियाचा नवा कोच कोण होईल, याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, पण गंभीरने मात्र रोहितच टीमचा कॅप्टन होईल, असे संकेत दिले आहेत. 'रोहित शर्मा आणि राहुल द्रविड भारतीय क्रिकेटला या फॉरमॅटमध्ये पुढे घेऊन जातील. इंग्लंडप्रमाणे भारतीय टीम आयसीसी स्पर्धा जिंकेल,' असं गंभीर म्हणाला आहे.
रोहित शर्माने कधीच आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलेलं नाही. पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नवा कॅप्टन आणि कोच यांना टीम बांधणीसाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. राहुल द्रविड याआधी दोन अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कोच होता. 2016 साली इशान किशनच्या नेतृत्वात भारतीय टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली होती, पण वेस्ट इंडिजकडून टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2018 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ट्रॉफी जिंकली होती.
2014 साली इंग्लंड टेस्टसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा बॅटिंग सल्लागार होता. जुलै 2021 मध्ये त्याने रवी शास्त्रींच्या अनुपस्थितीमध्ये श्रीलंका दौऱ्यात मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. टीम इंडियाचे मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली होती. शिखर धवन त्या टीमचा कर्णधार होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, Rohit sharma, T20 world cup