• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा विजयी सिक्सर, सहावा वर्ल्ड कप जिंकून घडवला इतिहास!

T20 World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा विजयी सिक्सर, सहावा वर्ल्ड कप जिंकून घडवला इतिहास!

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

 • Share this:
  दुबई, 14 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने पाच वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर आता रेकॉर्ड 6 वर्ल्ड कप आहेत. न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले. मार्शच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नर 38 बॉलमध्ये 53 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 18 बॉलमध्ये नाबाद 28 रनवर राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टचं यशस्वी ठरला. 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन बोल्टने 2 विकेट घेतल्या. याशिवाय कोणत्याही बॉलरला विकेट मिळाली नाही. त्याआधी केन विलियमसनच्या (Kane Williamson) वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला (Australia vs New Zealand) विजयासाठी 173 रनचं आव्हान दिलं. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 172 रन केले. केन विलियमसनने 48 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली. विलियमसनच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय मार्टिन गप्टीलने 28 रन केले, पण यासाठी त्याला 35 बॉल खर्च करावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. एडम झम्पाला एक विकेट घेण्यात यश आलं. मिचेल स्टार्कने त्याच्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 60 रन दिले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने (Aron Finch) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला टीममध्ये एक बदल करावा लागला. डेवॉन कॉनवेऐवजी (Devon Conway) टीम सायफर्टचा टीममध्ये समावेश झाला, तर ऑस्ट्रेलियाने टीममध्ये कोणताच बदल केलेला नाही. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. हे दोन्ही सामने अत्यंत रोमांचक झाले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या टीम वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी विजयाच्या प्रबळ दावेदार नव्हत्या, पण दोघांनी धमाकेदार कामगिरी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. या दोन्ही टीमना अजूनपर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडला एकदाही ऑस्ट्रेलियाला हरवण्यात आलेलं नाही. यंदाही हे रेकॉर्ड कायम राहिलं. गेल्या काही वर्षांमध्ये न्यूझीलंडची कामगिरी कमालीची सुधारली आहे. न्यूझीलंडची टीम 2015 आणि 2019 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली, पण दोन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये केन विलियमसनच्या टीमने भारताचा पराभव केला, पण वर्षातली दुसरी ट्रॉफी जिंकण्यात किवी टीमला अपयश आलं.
  Published by:Shreyas
  First published: