दुबई, 16 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) उद्यापासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेतला भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) असणार आहे. 24 ऑक्टोबरला दोन्ही टीम एकमेकांना भिडतील. या सामन्यात पाकिस्तानचा विजय होईल, असा विश्वास बाबर आझमने (Babar Azam) व्यक्त केला आहे. दुसरीकडे वनडे आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा आतापर्यंत कधीच पराभव केलेला नाही, त्यामुळे यंदाही हेच रेकॉर्ड कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
पाकिस्तानने गेल्या काही काळात त्यांचं बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि पीएसएल युएईमध्येच खेळली आहे, त्यामुळे इथल्या वातावरणाबाबत टीमच्या खेळाडूंना माहिती आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात गोष्टी सोप्या ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल,असं बाबर म्हणाला.
टी-20 फॉरमॅटमध्ये सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम हे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. या वर्ल्ड कपमध्ये कोण खेळाडू सर्वाधिक यशस्वी होईल, असं बाबरला विचारण्यात आलं तेव्हा त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचं (Kane Williamson) नाव घेतलं.
टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये पाकिस्तानने अखेरच्या क्षणाला बदल केले. शोएब मलिक (Shoaib Malik), फखर झमान (Fakhar Zaman) आणि हैदर अली (Haider Ali) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं. यावरही बाबरने भाष्य केलं. शोएब मलिक टीममधला सगळ्यात फिट खेळाडू आहे, तसंच त्याला टी-20 क्रिकेटचा अनुभवही आहे. त्याला कोणत्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवायचं, याचा निर्णय नंतर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया बाबरने दिली.
'पाकिस्तानची टीम न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपआधी खेळणार होती, पण या दोन्ही सीरिज रद्द झाल्या. स्थानिक टी-20 स्पर्धेमध्ये मलिक, हैदर अली आणि फखर झमान चांगले खेळले, त्यामुळे त्यांची पाकिस्तानच्या टीममध्ये निवड झाली,' असं बाबरने सांगितलं.
बाबर आझमचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. 61 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 46.89 च्या सरासरीने 2,204 रन केले, यामध्ये 1 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये बाबर मोहम्मद रिझवानसोबत ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. रिझवाननेही टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने आणि 48.4 च्या सरासरीने रन केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli