अबु धाबी, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनलचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia vs West Indies) तब्बल 8 विकेटने विजय झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नेट रनरेटला मोठा बूस्टर डोस मिळाला. वेस्ट इंडिजने दिलेलं 158 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 56 बॉलमध्ये नाबाद 89 रन केले. तर मिचेल मार्श (Mitchell Marsh) 32 बॉलमध्ये 53 रनवर आऊट झाला. वेस्ट इंडिजकडून अकील हुसेन आणि क्रिस गेलला (Chris Gayle) प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 157 रनवर रोखलं. कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) 31 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली. एव्हिन लुईसने 29 आणि शिमरन हेटमायरने 27 रन केले. आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या ड्वॅन ब्राव्होला 10 रन करता आले.
ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या या विजयामुळे आता दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये पोहोचणं कठीण झालं आहे. सेमी फायनलला पोहचण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्धच्या (South Africa vs England) सामन्यात मोठा विजय मिळवावा लागणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजच्या शेवटच्या काही मॅच शिल्लक आहेत, पण पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन टीमच सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातल्या सामन्यानंतर सेमी फायनलची तिसरी टीम निश्चित होईल. तसंच सेमी फायनलची चौथी टीम रविवारी किंवा सोमवारी ठरेल. रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड-अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर भारताचं आव्हान रविवारीच संपुष्टात येईल.
वेस्ट इंडिजची निराशाजनक कामगिरी
सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने यंदाच्या स्पर्धेत मात्र निराशाजनक कामगिरी केली. सुपर-12 च्या पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या वेस्ट इंडिजला फक्त बांगलादेशविरुद्धचा एकच सामना जिंकता आला. उरलेल्या चारही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup