नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र सलग दोन पराभवानंतर हे चित्र बदललं आहे. सेमी फायनल गाठण्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे, कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा मन तुटले. यामध्ये माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागचादेखील (Virendra Sehwag) समवेश आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागने भारताने निराशाजनक कामगिरी केल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने न्यूझीलंड संघाचे कौतुकही केले आहे. ट्विट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
''भारताकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. न्यूझीलंड संघाने शानदार खेळ केला. भारताची देहबोली चांगली नव्हती. संघातील खेळाडूंनी चुकीचा शॉट निवडला. जसे पूर्वी झाले आहे. या पराभवामुळे टीम इंडियाला मोठे नुकसान पोहचले आहे. त्यामुळे आता टीम इंडियावर गंभीर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ''असे मत सेहवागने ट्विटमध्ये व्यक्त केले आहे.
या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहलीचा बचाव करत याला केवळ कोहलीच नाही तर संपूर्ण संघच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
''विराट कोहलीवर टीका होत आहे, पण यासाठी केवळ एकच व्यक्ती अपयशी नसून या निराशजनक कामगिरूला संपूर्ण संघ आणि प्रशिक्षक जबाबदार आहेत. भारतीय चाहत्यांसाठी हे एक भयानक हॅलोविन आहे." असे मोहम्मद अझरुद्दीनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
रविवारी झालेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आले. रवींद्र जडेजा 19 बॉलमध्ये 26 रनवर नाबाद राहिला, तर हार्दिकने 23 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर ईश सोढीला 2 विकेट मिळाल्या.
भारताने दिलेलं 111 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डॅरेल मिचेलने 35 बॉलमध्ये 49 रन केले, तर केन विलियमसन 33 रनवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 league, T20 world cup, Team india