नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) इंग्लंड दौरा संपल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते टी- वर्ल्ड कप स्पर्धेचे (T-20 World cup). संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये (UAE) 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून ती 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. 16 देशांच्या टीम यात सहभागी होणार असून पहिला सामना ओमानमध्ये (Oman) होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (Indian Cricket Board) नुकतीच या स्पर्धेसाठी भारतीय टीम (Indian Team) जाहीर केली आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील 15 सदस्यीय टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, काही नवीन चेहऱ्यांचीही वर्णी लागली आहे. मात्र अनुभवी खेळाडूंना वगळल्यानं चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या खेळाडूंची टीममध्ये निवड झाली असती तर ते भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकले असते, असं मत व्यक्त होत आहे.
भारतीय टीममध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर शिखर धवन (Shikhar Dhawan), यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांना वगळण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानात तालिबान्यांचं थैमान; राशिद खान आणि नबी आहेत कुठे?
अनुभवी बॅटसमन शिखर धवन दीर्घ काळापासून भारतीय टीममध्ये रोहित शर्मासोबत सलामीची (Opening Batsman) जबाबदारी बजावत आहे. धवन नेहमीच टीम इंडियाचा सर्वोत्तम बॅटसमन असल्याचं सिद्ध करतो, पण तरीही त्याला या स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. श्रीलंका दौऱ्यात त्यानं उत्तम खेळ केला तसंच आयपीएलच्या पूर्वार्धातही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तरीही त्याला संघातून वगळण्यात आल्यानं संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिखर धवनप्रमाणेच टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यजुवेंद्र चहललाही (Yuzvendra Chahal) संघात न घेतल्यानं चाहते निराश झाले आहेत. विराट कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक असलेल्या चहलसारख्या अनुभवी स्पिनरऐवजी (Spinner) राहुल चाहरला स्थान देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवड समितीनं शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यालाही राखीव खेळाडूंमध्ये बसवून चाहत्यांना धक्का दिला आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या शार्दुल ठाकूरनं कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरीनं आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्यानं बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी सरस राहिली आहे. या स्पर्धेतही तो आपली चमक दाखवू शकला असता. मात्र त्याला मुख्य संघात स्थान देण्याऐवजी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे.
निवड समितीनं शिखर धवन, यजुवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूर यांना मुख्य टीममध्ये स्थान न दिल्याचा फटका भारताला बसू शकतो, अशी चर्चा चाहत्यांमध्ये असून, निवड समितीच्या या निर्णयाबद्दल चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. संघात स्थान मिळालेले नवीन खेळाडू संधीचं सोनं करतात का याकडे सर्वांच लक्ष राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india