Home /News /sport /

स्लेजिंगचा आरोप होत असणाऱ्या कोहलीचं सूर्यकुमारने केलं होतं कौतुक, जुने Tweets व्हायरल

स्लेजिंगचा आरोप होत असणाऱ्या कोहलीचं सूर्यकुमारने केलं होतं कौतुक, जुने Tweets व्हायरल

मुंबईच्या सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खेळीमुळे मुंबई इंडियन्सने कोहलीच्या RCBवर आरामात विजय मिळवला.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : आयपीएल 2020 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅंगलोरचा पाच विकेटने पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे मुंबईने कोहलीच्या संघावर आरामात विजय मिळवला. बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या बॅटिंगचे असंख्य चाहते आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील त्याचा चाहता आहे. पण कालच्या सामन्यात विराट कोहलीने सूर्यकुमार यादव याच्याबरोबर केलेल्या वर्तणुकीने क्रिकेट चाहते दुखावले आहेत. या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबईला विजय मिळवून देत त्याचं संघातल्या निवडीचं महत्त्व सिद्ध केलं. एक दिवस आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केला. त्यात  सूर्यकुमार यादवला स्थान मिळालं नाही.  बँगलोरच्या 165 धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमारने नाबाद 79 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपली निवड न करणाऱ्या निवड समितीला त्याने आपल्या कामगिरीने सडेतोड उत्तर दिलं आहे. या सामन्यात चौकार मारत विजय मिळवल्यानंतर त्याने केलेल्या कृत्याची देखील सगळीकडे चर्चा होत आहे. सूर्यकुमारने या सामन्यात डेल स्टेनने टाकलेल्या 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फटका मारल्यानंतर विराट कोहलीने फिल्डिंग केली. त्यानंतर ओव्हर संपल्याने विराट कोहली चालत सूर्यकुमारकडे आला आणि चालत येताना दोघांनीही एकमेकांना एक 'लुक' दिला. जवळ येऊन विराट सूर्याकडे डोळे मोठे करून पाहत होती. सूर्यकुमार यादव देखील त्याच्याकडे पाहत होता, पण तो शांतपणे तो दुसऱ्या विरुद्ध दिशेला निघून गेला. (हे वाचा-धोनीच्या फॅनची क्रिकेटपटूकडून ट्विटरवरच शाळा, माहीवरील टीकेमुळे भडकला होता चाहता) हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. मात्र यानंतर कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. कोहलीने यादवकडे येत उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर सूर्यकुमारने तिथून निघून जात विषय तेथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. विराटला कुठल्याही परिस्थितीत विजय हवा होता त्यामुळे तो स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करत होता असं चाहत्यांचं मत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी सूर्यकुमारची बाजू घेतली आहे. सूर्यकुमारने आधी  विराट कोहलीविषयी केलेली जुनी ट्विट चाहत्यांनी शोधून काढली आहेत सूर्यकुमारचे हे ट्वीट्स पुन्हा व्हायरल होत आहेत. यामध्ये तो कोहली आणि आरसीबीचे कौतुक करताना दिसून येत आहे. यातील एका ट्विटमध्ये त्याने कोहलीच्या कसोटी आणि वन-डे क्रिकेट फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचं कौतुक केलं होतं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने म्हटलं आहे की, 'मी भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर देवाला बॅटिंगसाठी येताना पहिलं आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसतं.' त्यामुळे विराट कोहलीच्या या कृत्याची सोशल मीडियावर मोठी निंदा होत आहे. (हे वाचा-IPL 2020 : RCBच्या पराभवासाठी विराट जबाबदार?वाचा का टेकावे लागले मुंबईसमोर गुडघे) दरम्यान, या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असून त्याने 12 सामन्यांत 155 च्या स्ट्राईक रेटने 362 धावा केल्या आहेत. तरीदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची भारतीय संघात निवड न झाल्याने सिलेक्शन कमिटीवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अगदी मोठमोठे खेळाडू आणि क्रिकेट समीक्षकांनी देखील सूर्यकुमारची निवड होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या