मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: हैदराबादमध्ये सूर्यकुमार यादवचा 'वरचा क्लास...', टीम इंडियाचं मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते

Ind vs Aus: हैदराबादमध्ये सूर्यकुमार यादवचा 'वरचा क्लास...', टीम इंडियाचं मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते

भारत वि. ऑस्ट्रेलिया

भारत वि. ऑस्ट्रेलिया

Ind vs Aus: सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीनं टीम इंडियाला हैदराबाद टी20त सहज विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियानं ही मालिका 2-1 अशी जिंकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

हैदराबाद, 25 सप्टेंबर: आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि हेच हैदराबादच्या मैदानात रोहित शर्माच्या शिलेदारांनी दाखवून दिलं. भारतानं हैदराबादचा तिसरा टी20 सामना 6 विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 टी20 सामन्यांची मालिका खिशात घातली. पण या विजयात चमकला नव्हे तर तळपला मुंबईचा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं विराट कोहलीच्या साथीनं 187 रन्सचं लक्ष्य टीम इंडियासाठी सोपं करुन सोडलं. त्यामुळे या निर्णायक सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली आणि मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते केलं.

सूर्यकुमारची वादळी खेळी

ऑस्ट्रेलियानं हैदराबादमध्ये टीम इंडियासमोर 187 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण लोकेश राहुल (1) आणि कर्णधार रोहित शर्मा (17) ही सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर भारताची 2 बाद 30 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्या आणि विराटनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्यानंतर या दोघांच्या फटकेबाजीनं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. पण त्यात सूर्यकुमार विराटपेक्षा आक्रमक दिसला. त्यानं ऑस्ट्रेलियाची बॉलिंग अक्षरश: फोडून काढली. तिसऱ्या विकेटच्या रुपात बाद होण्यापूर्वी सूर्यानं अवघ्या 36 बॉल्समध्ये 5 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 69 रन्स फटकावले. सूर्या आणि विराटनं मिळून तिसऱ्या विकेटसाठी 104 धावा जोडल्या. हाच सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला.

विराटची दमदार खेळी

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं डाव पुढे नेला. त्यानंही 48 बॉल्समध्ये 3 फोर आणि 4 सिक्ससह 63 रन्सचं योगदान दिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये अकरा रन्स हवे असताना विराटनं पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकला. पण पुढच्याच बॉलवर तो फिंचच्या हातात कॅच देत बाद झाला. पण त्यानंतर हार्दिक पंड्यानं (25) विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

रोहितच्या नेतृत्वात सलग नववा मालिकाविजय

हैदराबाद टी20 जिंकून टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित पूर्णवेळ कॅप्टन बनल्यानंतर भारताचा द्विपक्षीय मालिकेतला हा सलग 9वा मालिकाविजय ठरला. तर यंदाच्या वर्षात सर्वात जास्त टी20 सामने जिंकण्याची कामगिरीही टीम इंडियानं केली आहे.

हेही वाचा - Cricket Laws: अखेर रन आऊटच्या 'त्या' निर्णयावर MCC कडून स्पष्टीकरण, बॅट्समनना दिला थेट इशारा

ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा तडाखा

त्याआधी कॅमेरुन ग्रीन (52), टिम डेव्हिडच्या (54) तडाखेबंद अर्धशतकांमुळे टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियानं 187 रन्सचं आव्हान उभं केलं होतं. ग्रीनच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं पॉवरप्लेमध्येच 66 धावा ठोकल्या होत्या. पण अक्षर पटेल पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला. त्यानं 33 रन्समध्ये तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन बॅटिंगला वेसण घातली. पण अक्षरचा कोटा संपताच टिम डेव्हिडनं भारतीय बॉलर्सवर आक्रमण करत 27 बॉल्समध्ये 54 रन्स फटकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 7 बाद 186 धावांची मजल मारता आली.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Virat kohli