'...त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो', चॅपलचं कौतुक करणारा टीम इंडियाचा पहिलाच खेळाडू

'...त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो', चॅपलचं कौतुक करणारा टीम इंडियाचा पहिलाच खेळाडू

2011 साली टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयाचं श्रेय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) यांना देण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 11 जून : 2011 साली टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयाचं श्रेय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) यांना देण्यात आलं. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना (Suresh Raina) याने मात्र ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचं कौतुक करणारा सुरेश रैना हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. 2005 साली चॅपल यांना भारतीय टीमचं प्रशिक्षक बनवण्यात आलं, पण त्यांची कारकिर्द फार वादग्रस्त राहिली. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे आणि कर्णधार सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) बरेच वाद झाले. अखेर सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पाय उतार व्हावं लागलं. 2007 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम पहिल्याच राऊंडला बाहेर पडल्यानंतर चॅपल यांनी राजीनामा दिला.

टीम इंडियाने 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला, तर धोनीच कर्णधार असताना 2007 साली भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. रैनाने त्याचं आत्मचरित्र 'बिलिव्ह, व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टॉट मी,' या पुस्तकात चॅपल यांच्या प्रभावाबाबत सांगितलं आहे. चॅपल प्रशिक्षक असताना सुरेश रैना, श्रीसंत (Sreesanth) आणि मुनाफ पटेल (Munaf Patel) यांनी टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. भारताच्या 2011 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये हे तिन्ही खेळाडू होते.

'ग्रेग चॅपल यांना भारतीय खेळाडूंची एक पिढी तयार करण्याचं श्रेय मिळायला पाहिजे. त्यांनी ज्या बी रोवल्या, त्याची फळं नंतर मिळाली, जेव्हा आपण 2011 वर्ल्ड कप जिंकलो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेच वाद झाले, पण त्यांनी टीमला जिंकवणं आणि जिंकवण्याचं महत्त्व सांगितलं,' असं रैना त्याच्या पुस्तकात म्हणाला.

90 च्या दशकात आणि 2000 सालच्या सुरुवातीला भारतीय टीम आव्हानाचा पाठलाग करताना अपयशी ठरायची. पण चॅपल प्रशिक्षक आणि राहुल द्रविड कर्णधार असताना भारताने आव्हानाचा पाठलाग करताना लागोपाठ 14 मॅच जिंकल्या. 'त्या काळात आम्ही चांगले खेळत होतो, पण टीम बैठकीमध्ये चॅपल आव्हानाचा पाठलाग करण्यावर जोर द्यायचे,' असं रैनाने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 3:03 PM IST

ताज्या बातम्या