मुंबई, 24 मार्च : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच संपलेली वन-डे सीरिज भारताला 2-1 अशा फरकानं गमवावी लागली आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवनं निराशाजनक कामगिरी केली आहे. सलग तीन वेळा गोल्डन डकवर आऊट होणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा अपमानकारक वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे. सीरिजमधील पहिल्या आणि दुसऱ्या वन-डेमध्ये मिचेल स्टार्ककडून एलबीडब्ल्यू आऊट झाला तर चेन्नईतील शेवटच्या मॅचमध्ये अॅश्टन अॅगरनं त्याला क्लीन-बोल्ड केलं. त्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय टीमचे माजी कॅप्टन आणि ज्येष्ठ कसोटीपटू सुनील गावसकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्कायच्या (सूर्यकुमार यादव) खेळण्यात काय चूक झाली आहे? त्याची सध्याची कामगिरी बघता तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? असे प्रश्न स्टार स्पोर्ट्सवरील पोस्ट मॅच शोमध्ये सुनील गावसकर यांना विचारण्यात आले होते. तेव्हा महान बॅट्समन असलेल्या गावसकर यांनी अनपेक्षित उत्तर दिलं. ते म्हणाले "काहीच नाही, काहीही नाही". म्हणजेच गावसकर यांच्या मते स्कायला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही.
IPL2023 चा थरार वाढवणार नवे 8 नियम, जाणून घ्या काय झालेत बदल
गावसकर पुढे म्हणाले, "त्याला नुकतंच लक्षात आलं असेल की सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही वाईट दिवस बघावे लागू शकतात. सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या बाबतीत असं अनेकदा घडलेलंही आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याने आता फक्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या तीन मॅचेस विसरून त्यानं आयपीएलवर लक्ष केंद्रित करावं. तिथे रन्स करावेत. एकदा त्यानं आयपीएलमध्ये रन्स केले की तो पुढच्या वन-डे मॅचेसमध्ये आत्मविश्वासानं उतरेल."
पहिल्याच बॉलवर तीनदा आउट झालेल्या स्कायमध्ये दोष शोधणं कठीण असल्याचं गावसकर म्हणाले. "तो पहिल्याच बॉलवर तीन वेळा आउट झाला असला तरी त्याचं काय चुकत आहे, हे सांगणं फार कठीण आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये मिशेल स्टार्कनं फेकलेले बॉल चांगले होते. कदाचित स्काय जास्तच चिंताग्रस्त झाला असेल, " असं गावसकर म्हणाले. विशेष म्हणजे भारताचा कॅप्टन रोहित शर्मानंदेखील मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत असंच काहीसं मत मांडलं.
पाकिस्तानी क्रिकेटपटूला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, आफ्रिदीने पाण्यासारखे पैसे खर्च करून वाचवलं!
तीनवेळा शून्यावर आउट होण्याचा स्कायच्या वन-डे वर्ल्ड कप टीममधील समावेशावर परिणाम होऊ शकतो का? असं विचारलं असता, गावसकर म्हणाले की, तो आयपीएल आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो यावर त्याची निवड अवलंबून असेल.
स्कायच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला वन-डे टीममधून वगळण्याची मागणी केली जात आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली पाहिजे, असं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. संजूनं आतापर्यंत खेळलेल्या 11 वन-ोडे मॅचेसमध्ये 66 च्या सरासरीनं रन्स केले आहेत. टीम मॅनेजमेंट मात्र स्कायला पाठीशी घालण्याच्या निर्णयावर ठाम दिसत आहे. त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला मॅनेजमेंटचा पाठिंबा मिळत आहे. सध्या तो टी-20 फॉरमॅटमध्ये अव्वल क्रमांकाचा बॅट्समन आहे. त्याने सहा महिन्यांच्या कालावधीत तीन शतकं झळकावलेली आहेत. पण, वन-डे क्रिकेटमध्ये तो अद्याप प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket