मुंबई, 5 जून : वेस्ट इंडिज (West Indies) आणि ऑस्ट्रेलियाने (Australia) ज्याप्रमाणे जागतिक क्रिकेटवर राज्य केलं, त्याप्रमाणे भारतीय टीम (Team India) करू शकणार नाही, असं भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना वाटतं. सध्याच्या भारतीय टीमची तुलना 70-80 च्या दशकातल्या वेस्ट इंडिजसोबत करणं घाईचं ठरेल. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया प्रतिभाशाली दिसत असली, तरी त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव आहे, हाच भारताच्या क्रिकेटवर राज्य करण्याच्या स्वप्नांमधला अडथळा आहे, असं गावसकर म्हणाले.
एका युट्युब कार्यक्रमात गावसकर बोलत होते. 'वेस्ट इंडिजची टीम पाचही टेस्ट मॅच जिंकायची. ही भारतीय टीम तशाप्रकारे क्रिकेटवर राज्य करेल, असं मला वाटत नाही. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाची टीमही पाच पैकी चार सामने जिंकायची. भारतीय टीम सातत्याने चांगली कामगिरी करत नाही, याच कारणामुळे मला भारतीय टीम जगावर राज्य करेल असं वाटत नाही,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
'प्रत्येकवेळी 11 खेळाडू यशस्वी ठरत नाहीत. दोन-चार बॅट्समन आणि दोन बॉलर यशस्वी ठकले तरी तुम्ही बहुतेक मॅच जिंकता. भारतीय टीममध्ये असं करण्याची क्षमता आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी हे सिद्ध केलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत दोनदा पराभव केला. यानंतर इंग्लंडला 3-1 ने हरवलं,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने बराच काळ क्रिकेटवर राज्य केलं. 70-80 च्या दशकात वेस्ट इंडिजचा दबदबा होता. तर 90 च्या दशकात ऑस्ट्रेलियाने क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. 1975 आणि 1979 चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकला, पण 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजचा फायनलमध्ये पराभव केला आणि क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर झाला.
दुसरीकडे 1990 च्या दशकापासून ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर राज्य करायला सुरुवात केली. ऑक्टोबर 1999 ते नोव्हेंबर 2007 या काळात ऑस्ट्रेलियाने 93 पैकी 72 टेस्ट जिंकल्या तर 11 मॅच ड्रॉ झाल्या. वनडे क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलियाने सगळ्यांना धूळ चारली. 1999, 2003 आणि 2007 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तसंच त्यांनी 2006 आणि 2009 साली लागोपाठ दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, Sunil gavaskar, Team india, West indies