मुंबई, 3 जून : टीम इंडियामध्ये (Team India) निवड होण्यासाठी वय हा सगळ्यात मोठा निकष मानला जातो, पण वयाच्या 34 व्या वर्षीही सौराष्ट्रचा बॅट्समन शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) याला टीम इंडियामध्ये निवड होण्याची अपेक्षा आहे. या वयात टीम इंडियामध्ये निवड होणं सोपं नाही, पण मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करायला तयार आहे, असं जॅक्सनने आमची सहयोगी वेबसाईट क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. निवड समितीचं दुर्लक्ष याशिवाय खेळाच्या वेगवेगळ्या पैलूंवर जॅक्सन बोलला. तसंच टीममध्ये निवड होण्यासाठी वयाच्या निकषावरही त्याने टीका केली.
'30 वर्षानंतर तुम्ही टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी योग्य नाही, असं कोणत्या नियमात लिहिलं आहे? तुम्हाला कोणत्या क्षमतेवर पारखलं जातं. रणजीमध्ये (Ranji Trophy) तुम्ही गेल्या काही मोसमांपासून वारंवार 800 पेक्षा जास्त रन करत आहात, याचा अर्थ तुम्ही फिटही असालच. म्हणूनच तुम्ही मैदानात एवढा वेळ उभे राहू शकता,' असं जॅक्सन म्हणाला.
'यावर्षी मी चांगली कामगिरी केली नाही? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) आणि विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy)? या अनिश्चित काळात जेव्हा रणजी ट्रॉफी होत नाही, तेव्हा मिळेल तिकडे सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. यावर्षी मी चांगली कामगिरी केली, म्हणून मी बोलू शकतो. माझ्याकडे असं रेकॉर्ड आहे, ज्याबद्दल कोणीच बोलत नाही. मी रणजी ट्रॉफीमध्ये 100 पेक्षा जास्त सिक्स मारल्या. ज्या फॉरमॅटमध्ये कमी धोका पत्करायचा असतो, तिकडे मी सर्वाधिक धोका पत्करतो, कारण माझ्याकडे तसा खेळ आहे,' अशी प्रतिक्रिया जॅक्सनने दिली.
जॅक्सनने 2019-20 रणजी ट्रॉफी मोसमात 18 इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने 809 रन केले. जॅक्सन सौराष्ट्रकडून सर्वाधिक रन करणारा बॅट्समन होता. जॅक्सनच्या या कामगिरीमुळेच सौराष्ट्रने फायनलमध्ये बंगालला पराभूत करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली. 2018-19 च्या मोसमातही जॅक्सनने 47.44 च्या सरासरीने 854 रन केले. तेव्हाही सौराष्ट्र फायनलमध्ये पोहोचली होती, पण त्यावेळी फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला होता. उपविजेता असूनही सौराष्ट्रच्या एकही खेळाडूची इंडिया-ए साठी निवड झाली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india