कोलंबो, 16 सप्टेंबर: आशिया चषक जिंकून श्रीलंका संघानं क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. टी20 रँकिंगमध्ये आठव्या नंबरवर असलेल्या लंकेनं दुसऱ्या क्रमांकावरच्या पाकिस्तानला दुबईच्या मैदानात धूळ चारली. श्रीलंका क्रिकेटसाठी हा विजय नवी उभारी देणारा ठरला. पण आता आशिया चषक जिंकल्यानंतर श्रीलंकन संघ सज्ज झाला आहे तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी. आज श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणाही केली. पण त्यात दोन अनफिट खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.
आशिया कप विजेत्या खेळाडूंचा भरणा
वर्ल्ड कपसाठीच्या संघात निवडकर्त्यांनी आशिया कप विजेत्या टीममधील खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. पण महीश पथिराणा, नुवान तुषारा आणि असिता फर्नांडोला मात्र वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेलं नाही. त्याऐवजी श्रीलंकेनं आशिया कपआधी दुखापत झालेल्या दुष्मंथा चमिरा आणि लाहिरु कुमाराला संघात स्थान दिलं आहे. दुष्मंथा चमिरा हा श्रीलंकेचा सध्याचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. पण चमिरा आणि लाहिरु यांच्या फिटनेसबाबत श्रीलंकन संघव्यवस्थानपन अजूनही साशंक आहे. त्यामुळे स्टँडबाय खेळाडूंपैकी दोन खेळाडू संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
दिनेश चंडिमलकडे पुन्हा दुर्लक्ष
श्रीलंकेचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश चंडिमलचा आशिया कपसाठीच्या संघात समावेश होता. पण त्याला अंतिम अकरात स्थान मिळालं नाही. आता वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय संघातूनही चंडिमलला वगळण्यात आलं आहे. त्याला स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आलं आहे.
Here's your 🇱🇰 squad for the ICC Men's T20 World Cup! ⬇️#RoaringForGlory #T20WorldCup pic.twitter.com/GU7EIl6zOw
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 16, 2022
वर्ल्ड कपसाठीचा श्रीलंकन संघ - दसून शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पथुम निसंका, कुशल मेंडिस, चरिता असलंका, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, वानिन्दू हसरंगा, महेश तिक्षणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, दिलशान मधुशंका, प्रमोद मधुशान.
स्टँड बाय खेळाडू: अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 world cup 2022