मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup आधीच डेल स्टेनची निवृत्ती, इमोशनल पोस्ट लिहित केली घोषणा

T20 World Cup आधीच डेल स्टेनची निवृत्ती, इमोशनल पोस्ट लिहित केली घोषणा

महान खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

महान खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डेल स्टेनने मंगळवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डेल स्टेनने मंगळवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. स्टेनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 635 विकेट आहेत. त्याने टेस्टमध्ये 435, वनडेमध्ये 196 आणि टी-20 मध्ये 64 विकेट घेतल्या. स्टेनने ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. इमोशनल पोस्ट लिहित स्टेनने आपल्या टीमचे खेळाडू, चाहते, कुटुंब आणि पत्रकारांचे आभार मानले आहेत.

डेल स्टेनने आपल्या वनडे आणि टेस्ट टीमच्या जर्सीचे काही फोटो पोस्ट करत एक नोट लिहिली. '20 वर्षांचं ट्रेनिंग, मॅच, प्रवास, विजय, पराभव, आनंद. खूप आठवणी आहेत सांगण्यासाठी. खूप चेहरे आहेत धन्यवाद देण्यासाठी. आज मी अधिकृतरित्या निवृत्ती घेत आहे. या खेळावर मी खूप प्रेम करतो. आंबट-गोड खूप आठवणी आहेत. मी कुटुंब, टीम आणि खेळाडूंचे धन्यवाद देतो,' असं स्टेन म्हणाला.

डेल स्टेनने यावर्षी जानेवारी महिन्यात आपण आयपीएल 2021 मध्ये सहभागी होणार नाही, हे सांगितलं होतं, पण त्याने निवृत्तीची घोषणा केली नव्हती. ऑगस्ट 2019 साली त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2020 साली त्याला दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या करारातून वगळण्यात आलं होतं. स्टेन 2020 साली दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 टीममध्ये निवडला गेला होता, तसंच त्याने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण कोरोना व्हायरसमुळे 2020 सालचा टी-20 वर्ल्ड कप झाला नाही. आता ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीच स्टेनने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला.

2003 साली स्टेनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर एका वर्षातच स्टेनची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली. 2004 साली इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ टेस्टमधून त्याने पदार्पण केलं. 2004 ते 2005 या काळात स्टेन फक्त 3 टेस्ट खेळला, यात त्याने 8 विकेट मिळवल्या. स्टेनने 2006 साली 6 टेस्टमध्ये 24 आणि पुढच्या वर्षी 7 टेस्टमध्ये 44 विकेट मिळवल्या. 2008 साली तर त्याने 13 टेस्टमध्ये तब्बल 74 विकेट मिळवल्या. डेल स्टेन 2,343 दिवस नंबर एक टेस्ट बॉलर होता, हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

First published:

Tags: Cricket