कोलकाता, 28 डिसेंबर : बीसीसीआय (BCCI) चा अध्यक्ष आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने रविवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (West Bengal Governor Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली आहे. गांगुलीच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा त्याच्या राजकीय मैदानात यायच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण राजभवनातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही शिष्टाचार भेट असून याचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे गांगुली-राज्यपाल भेटींमुळे गांगुलीबाबत राजकीय चर्चांना पुन्हा जोर आला. गांगुलीने राज्यपालांच्या भेटीच्या कारणाबाबत माहिती दिली नाही, पण धनखड यांनी सांगितल्यानुसार दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीने दिलेलं ईडन गार्डन मैदानात यायचं आमंत्रण स्वीकारलं असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. 'बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली संध्याकाळी साडेचार वाजता राजभवनात पोहोचले, यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. देशातलं सगळ्यात जुनं क्रिकेट स्टेडियम असलेल्या ईडन गार्डनला जायचं आमंत्रण स्वीकारलं आहे. ईडन गार्डनची स्थापना 1864 साली झाली होती,' असं ट्विट राज्यपालांनी केलं आहे. सौरव गांगुली जवळपास एक तास राजभवनावर होता.
दरम्यान आज सौरव गांगुली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील भेटणार आहेत. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात अरुण जेटली यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमात गांगुली आणि अमित शाह यांची भेट होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. राज्यात सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. याआधी 2019 साली लोकसभा निवडणुकीवेळीही सौरव गांगुली निवडणूक रिंगणात उतरेल, अशा बातम्या आल्या होत्या. त्यावेळी मात्र गांगुलीने या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. भाजप सौरव गांगुलीला पश्चिम बंगालमध्ये आपला चेहरा बनवू इच्छिते, अशीही चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.