मुंबई, 19 मे : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात गरजूंना मदत करत आहे. सोनू सूदच्या या कामाची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे. यानंतर आता सोनू सूदने चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) क्रिकेटपटू कर्ण शर्माचं (Karn Sharma) कौतुक केलं आहे. कर्ण शर्मा सोनू सूदच्या फाऊंडेशनला पाठिंबा देत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. प्रत्येक दिवशी देशात लाखो रुग्ण सापडत आहेत, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसाला तीन ते चार हजारांच्या घरात आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी सोनू सूदने सोनू सूद फाऊंडेशनची सुरुवात केली आहे.
सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कर्ण शर्माचं कौतुक केलं आहे. कर्ण शर्मा आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. 'सोनू सूद फाऊंडेशनला मदत करण्यासाठी खूप आभार, माझ्या भावा. तू पुन्हा एकदा देशाच्या तरुणांना प्रेरित केलं आहे. तुझ्यासारख्या लोकांमुळेच हे जग सुंदर आणि शांततापूर्ण आहे,' असं ट्वीट सोनू सूदने केलं.

सोनू सूदचं या भावुक ट्वीटवर कर्ण शर्मानेही प्रतिक्रिया दिली. तू देशाचा खरा हिरो आहेस, तू खूप चांगला प्रयत्न करत आहेस. तुला खूप शुभेच्छा, असंच काम करत राहा, भावा, अशी कमेंट कर्ण शर्माने केली.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे यंदाची आयपीएल 29 सामने झाल्यानंतर स्थगित करण्यात आली. आयपीएलच्या या मोसमात कर्ण शर्माला एकही सामना खेळता आला नाही. याआधी सोनू सूदने सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही मदत केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.