दिल्ली, 1 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा राष्ट्रीय स्तरावर असो खेळाडूंना डोपिंगच्या (उत्तेजक द्रव्य सेवन) चाचणीला सामोरं जावं लागतं. देशातील अनेक खेळाडू डोपिंगच्या विळख्यात सापडतात. पण यासाठी खेळाडूच नाही तर प्रशिक्षकही तितकेच दोषी असल्याचा आरोप भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हीने केला आहे. प्रशिक्षकच खेळाडूंना उत्तेजक द्रव्यांचे सेवन करायला भाग पाडत असल्याचे तिने म्हटले आहे.
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता आणि सहा वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या मेरी कोमने प्रशिक्षकांना देखील डोपिंग प्रतिबंधक जागरुकता प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं सांगितलं. ती डोपिंग प्रतिबंधक राष्ट्रीय संमेलनात बोलत होती. मेरी कोम म्हणाली की, प्रशिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याची गरज असून त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. ज्या औषधांच्या सेवनावर बंदी आहे त्याबाबत प्रशिक्षण द्यायला हवे असं मेरी कोमने म्हटले.
डोपिंग प्रतिबंधक राष्ट्रीय संमेलनात क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी मेरी कोमने काही प्रशिक्षक खेळाडूंना चुकीचा मार्ग दाखवतातय आणि त्यातूनच खेळाडू डोपिंगमध्ये अडकतात. क्रिडा मंत्री राठोड म्हणाले की, खेळाडूंनी डोपिंग करून काही मिळवण्याचं स्वप्न बघू नये. तुम्हाला पराभवातून मिळालेला धडा हा चुकीच्या मार्गाने पदक मिळवण्यापेक्षा चांगला असेल. जेव्हा तुम्हाला समजेल की अशा पद्धतीने पदक जिंकलंय तेव्हा स्वत:चा चेहरा बघायची लाज वाटेल.