Home /News /sport /

'टेस्टपेक्षा IPL खेळल्यामुळे टीमचा फायदा', हा खेळाडू बोर्डावर भडकला

'टेस्टपेक्षा IPL खेळल्यामुळे टीमचा फायदा', हा खेळाडू बोर्डावर भडकला

यंदाच्या वर्षाच्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 30 मे रोजी खेळवली जाईल. या स्पर्धेत बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) सहभागी होणार आहे. श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिज (Sri Lanka vs Bangladesh) खेळण्याऐवजी शाकिबने आयपीएलला प्राधान्य दिलं.

पुढे वाचा ...
    ढाका, 21 मार्च : यंदाच्या वर्षाच्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 30 मे रोजी खेळवली जाईल. या स्पर्धेत बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) सहभागी होणार आहे. श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिज (Sri Lanka vs Bangladesh) खेळण्याऐवजी शाकिबने आयपीएलला प्राधान्य दिलं, यावरून त्याच्यावर टीका झाली. या टीकेला शाकिबने प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या आयपीएल खेळण्याच्या निर्णयाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. बांगलादेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या रेसमध्ये नाही, त्यामुळे आयपीएल खेळणं जास्त महत्त्वाचं आहे, असं शाकिब म्हणाला. 'या दोन टेस्ट मॅच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधल्या आमच्या शेवटच्या असतील. आम्ही फायनलच्या रेसमधूनही बाहेर आहोत. बांगलादेशची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे, त्यामुळे आमचा फायनल खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट आयपीएल खेळली तर याचा फायदाच होईल, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. ही स्पर्धा महत्त्वाची आहे, कारण आपल्याला भविष्यात खूप काही मिळवायचं आहे, त्यामुळे मोठ्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी आयपीएलचा पर्याय चांगला आहे,' अशी प्रतिक्रिया शाकिबने दिली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाठवलेल्या पत्रात मी टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या तयारीबद्दल बोललो. पण अनेकजण टेस्ट सीरिजबद्दल बोलतायत. यापुढे मी टेस्ट क्रिकेट खेळणार नाही, असं त्यांना वाटतंय, पण त्यांना माझं पत्र समजलंच नाही, असं शाकिबचं म्हणणं आहे. 'मी पत्रात कुठेही यापुढे टेस्ट खेळणार नाही, असं म्हणलेलं नाही. वर्ल्ड कपच्या चांगल्या तयारीसाठी मला आयपीएल खेळायचंय असं मी स्पष्ट केलं आहे, पण तरीही बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक अध्यक्ष अकरम खान मला टेस्ट मॅचमध्ये खेळायचं नाही असं सांगत आहेत,' अशी संतप्त प्रतिक्रिया शाकिबने दिली. आयपीएलमध्ये शाकिब अल हसन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या