अंपायरवर भडकून स्टम्प उखडले, गैरवर्तनाबाबत शाकीबने मागितली माफी

अंपायरवर भडकून स्टम्प उखडले, गैरवर्तनाबाबत शाकीबने मागितली माफी

बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) ढाका प्रीमियर लीगमध्ये (DPL) केलेल्या गैरवर्तणुकीबाबत माफी मागितली आहे.

  • Share this:

ढाका, 11 जून : बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) ढाका प्रीमियर लीगमध्ये (DPL) केलेल्या गैरवर्तणुकीबाबत माफी मागितली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात शाकीबने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि अंपायरसमोरच दोन वेळा स्टम्प उखडले आणि फेकून दिले. याचसोबत त्याने विरुद्ध टीमचे प्रशिक्षक खालीद महमूद (Khalid Mahamood) यांच्यासोबतही वाद घातला. खालीद महमूद हे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालकही आहेत.

शाकीबच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका करण्यात आली. यानंतर त्याने माफी मागितली. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट लिहिली.

'मला स्वत:वरचं नियंत्रण सोडल्याचा सगळ्यांसाठी मॅच खराब करण्याचा खूप खेद आहे, खासकरून त्यांच्यासाठी जे घरून सामना बघत होते. माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूने अशाप्रकारची प्रतिक्रिया द्यायची गरज नव्हती, पण कधी कधी दुर्दैवाने अशा गोष्टी होतात. मी या चुकीबाबत टीम, प्रशासन, स्पर्धेचे अधिकारी आणि आयोजन समितीची माफी मागतो. भविष्यात अशा गोष्टी परत होणार नाहीत. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि खूप प्रेम,' अशी पोस्ट शाकीबने लिहिली.

गेल्या काही काळापासून शाकीब अल हसन वारंवार वादात सापडत आहे. मॅच फिक्सरने संपर्क केल्यानंतरही शाकीबने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला न सांगितल्यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती, यानंतर मागच्याच आठवड्यात बायो-बबलचा प्रोटोकॉल तोडल्यामुळेही शाकीब वादात अडकला होता. आता तर अंपायरसोबत गैरवर्तणुक केल्याचे शाकीबचे व्हिडिओ व्हायरल झाले.

शुक्रवारी ढाका प्रिमीयर लीग (DPL) चा 40 वा सामना मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि अभानी लिमिटेड यांच्यात झाला, त्यावेळी अंपायरने टीमच्या बाजूने निर्णय दिला नाही, म्हणून शाकीब संतापला.

मोहम्मदने 20 ओव्हरमध्ये 145 रन केले, यानंतर आव्हानाचा बचाव करण्यासाठी शाकीब पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आला. मुशफिकुर रहीमने शाकीबला एक फोर आणि एक सिक्स मारून 10 रन काढले. ओव्हरच्या एका बॉलला शाकीबने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, पण अंपायरने मुशफीकुरला नॉट आऊट दिलं. अंपायरचा हा निर्णय ऐकून शाकीब संतापला आणि त्याने स्टम्प लाथ मारून उखडले.

घडलेल्या प्रकारानंतर मोहम्मदन टीमचे खेळाडूही एकत्र आले आणि मैदानातला वाद आणखी वाढला. नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या नजमूल हुसेनलाही हा सगळा प्रकार पाहून धक्का बसला.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाकीब अल हसन पुन्हा एकदा अंपायरशी वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाकीबने अंपायरसमोर हातानेच स्टम्प उखडले आणि जोरात जमिनीवर फेकून दिले.

ढाका प्रिमीयर लीगमध्ये शाकीब खराब फॉर्ममध्ये आहे. पहिल्या 6 सामन्यांमध्ये त्याने 12.16 च्या सरासरीने 73 रन केले, यात तो दोन वेळा शून्य रनवर आऊट झाला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही त्याने निराशाजनक कामगिरी केली. अबहानीविरुद्धच्या या सामन्यात मात्र त्याने 27 बॉलमध्ये 37 रनची खेळी केली, यामध्ये 1 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. शाकीबच्या या कृत्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांसाठीही शाकीबला बांगलादेश बोर्डाकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 9:45 PM IST

ताज्या बातम्या