कोलकाता, 30 जानेवारी : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) बुधवारी कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गांगुली सध्या सध्या हृदयविकाराच्या आजारानं ग्रस्त आहे. या ठिकाणी गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली. दादांच्या प्रकृती संदर्भात अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
अपोलो हॉस्पिटलमध्ये सौरभ गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा एन्जियोप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत, शरीराचे सर्व व्हायटल पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे. शनिवारी संध्याकाळी डॉ. अफताब खान यांनी दादांच्या प्रकृतीची तपासणी केली असून त्यांना उद्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.
यापूर्वी गांगुलीला 2 जानेवारी रोजी छातीत दुखल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. कोलकात्याच्या वुडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार करण्यात आले होते. तर त्यावेळी गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर आता त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. सौरव गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाल्या होत्या.
अपोलो हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सुरज मंडल हे गांगुलीवर सध्या उपचार करत होते. आज डॉ. अफताब खान यांनी दादांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे. गांगुलीच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी अपोलो हॉस्पिटलनं चार सदस्यीय मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news