मुंबई, 7 जून : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी अश्विनबाबत (R Ashwin) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. अश्विन अजूनही ऑल टाईम ग्रेट झाला नसल्याचं मांजरेकर एका कार्यक्रमात म्हणाले होते, यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा याबाबत ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. अश्विनला ऑल टाईम ग्रेट क्रिकेटपटू म्हणण्यात एक अडचण आहे, असं मांजरेकर म्हणाले होते. हे सांगताना त्यांनी अश्विनच्या परदेशातल्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय मैदानांवर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आता अक्षर पटेल (Axar Patel) या स्पिनरनीही चांगली कामगिरी केली, असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा याचं कारण सांगत ट्वीट केलं आहे.
संजय मांजरेकर अनेकवेळा त्यांच्या क्रिकेटच्या विश्लेषणामुळे किंवा खेळाडूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत येतात. आता अश्विनबाबतच्या वक्तव्यावर ते ट्वीट करत म्हणाले, 'डॉन ब्रॅडमन, गारफील्ड सोबर्स, सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज ऑलटाईम ग्रेट आहेत.'
'ऑल टाईम ग्रेट ही क्रिकेटपटूला देण्यात येणारी सर्वोत्तम प्रशंसा आहे. ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर विराट हे क्रिकेटपटू या यादीत येतात. पण अश्विनचा योग्य सन्मान ठेवून तो अजूनतरी ऑल टाईम ग्रेट झालेला नाही,' असं मांजरेकर त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.
आर.अश्विन भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात यशस्वी स्पिनरपैकी एक आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचवण्यातही अश्विनने मोलाची भूमिका बजावली आहे. आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
'जेव्हा लोक अश्विनला महान क्रिकेटपटू म्हणतात तेव्हा मला त्यात अडचण वाटते. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये एकदाही इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या नाहीत. तुम्ही भारतीय विकेटवर त्याची दमदार कामगिरी बघत असाल तर जडेजानेही मागच्या 4 वर्षांत तेवढ्याच विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागच्या सीरिजमध्ये अक्षर पटेलने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या,' असं मांजरेकर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले होते.
अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 30 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 78 मॅचमध्ये 409 विकेट मिळवल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, R ashwin