मुंबई, 18 मे : जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) पुढच्या मोसमात बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी आणखी दोन टीम आयपीएलशी जोडली जाण्याची संभावना आहे. पुढच्या वर्षी आयपीएलच्या 10 टीम झाल्या, तर परदेशी खेळाडूंच्या नियमांमध्ये बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याच्या नियमानुसार प्रत्येक टीमला मैदानात फक्त 4 परदेशी खेळाडूच उतरवता येतात. या नियमांमुळे उत्कृष्ट खेळाडूंनाही बाहेर बसावं लागतं.
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी क्रिकइन्फोशी बोलताना या नियमामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. जर आयपीएल 10 टीमची झाली तर अंतिम 11 खेळाडूंमध्ये 5 परदेशी खेळाडू असावेत. टीम वाढवल्यामुळे भारतीय खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी योग्य संधी मिळेल, तसंच 5 परदेशी खेळाडू ठेवले तर 60 भारतीय खेळाडू मैदानात उतरू शकतील.
'आयपीएल 10 टीमची झाली तर प्रत्येक टीमकडे 5 परदेशी खेळाडू असावेत. जेव्हा आयपीएल किंवा टी-20 तसंच 50 ओव्हरचं क्रिकेट नव्हतं तेव्हा 70-80 च्या दशकात भारताकडे 13-14 खेळाडूच सर्वोच्च स्तरावर खेळले,' असं मांजरेकर म्हणाले.
'तुमच्याकडे खूप भारतीय खेळाडू आहेत आणि काही गुणवत्ता असलेले परदेशी खेळाडू बाहेर बसत आहेत, हे लाजीरवाणं आहे, कारण 4 पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळू शकत नाहीत, त्यामुळे आपण जरी 5 परदेशी खेळाडूंना संधी मिळाली, तरी भारतीय खेळाडूंची संख्याही वाढणार आहे,' अशी प्रतिक्रिया मांजरेकरांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.