विराटसेनेची तुलना इम्रान खान यांच्या पाकिस्तानी संघाशी, मांजरेकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना विराटची तुलना पाकचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी केली आहे.
मुंबई, 03 फेब्रुवारी : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केली. न्यूझीलंडला 5-0 ने पराभूत करून टी20 मध्ये असा पराक्रम करणारा भारत पहिला देश ठरला आहे. नव्या वर्षात भारताने एका पाठोपाठ एक विजय मिळवले असून विजयाची ही मालिका सुरूच आहे. भारताने पहिल्यांदा लंकेला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. आता न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत लोळवलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या या कामगिरीचे कौतुक सध्या सगळेच करत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना विराटची तुलना पाकचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी केली आहे. यामुळे चाहत्यांनी संजय मांजरेकर यांनी ट्रोल केलं आहे.
भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर येण्याची मांजरेकर यांची ही पहिलीच वेळ नाही. वर्ल्ड कपवेळीही त्यांनी टीम इंडियाच्या खेळाचे विश्लेषण करताना केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. अष्टपैलू क्रिकेटपटू जडेजाच्या खेळीवर केलेली कमेंटही वादात अडकली होती. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानतंर भारतीय संघाची तुलना इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील संघाशी करणं संजय मांजरेकर यांना महागात पडलं आहे. त्यांना भारतीय चाहत्यांनी फैलावर घेतलं.
India under Virat in NZ reminds me of Pakistan under Imran. Strong self belief as a team. Pakistan under Imran found different ways of winning matches, often from losing positions. That only happens when the self belief is strong.
संजय मांजरेकर यांनी ट्विट करताना म्हटलं की, सध्या न्यूझीलंडमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेला भारतीय संघ पाहून मला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालचा पाकिस्तानी संघाची आठवण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने अनेकवेळा हातातून गेलेला सामना जिंकला आहे. जेव्हा तुमचा स्वत:वरचा विश्वास दृढ असतो तेव्हाच हे शक्य होतं.
केएल राहुलचे कौतुकही संजय मांजरेकर यांनी केलं आहे. त्यांनी न्यूझीलंड दौऱ्यात काय सापडलं असेल तर भारताला केएल राहुलच्या रुपाने चांगला यष्टीरक्षक फलंदाज मिळाला असं संजय मांजरेकर म्हणाले. तसंच सॅमसन आणि पंत यांच्या फलंदाजीबद्दल बोलताना त्यांनी थोडं विराटकडून शिकायला हवं असं म्हटलं.