Home /News /sport /

'रहाणेमध्ये सातत्याचा अभाव', बांगरने सांगितला मधल्या फळीचा पर्याय

'रहाणेमध्ये सातत्याचा अभाव', बांगरने सांगितला मधल्या फळीचा पर्याय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, या सामन्यात एकाही भारतीय खेळाडूला अर्धशतक करता आलं नाही.

    मुंबई, 4 जुलै : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, या सामन्यात एकाही भारतीय खेळाडूला अर्धशतक करता आलं नाही. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासारखे दिग्गज बॅट्समनही या सामन्यात अपयशी ठरले. यानंतर पुजारा आणि रहाणे यांच्या कामगिरीवर टीका होऊ लागली आहे. टीम इंडियाचे माजी बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनीही अजिंक्य रहाणेमध्ये सातत्याचा अभाव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरला. जेव्हा आम्हाला बॅटिंगला बोलावलं तेव्हा आम्ही चांगला खेळ खेळलो आणि तीन विकेट गमावल्या, पण त्यानंतरच्या दिवशी न्यूझीलंडने शानदार पुनरागमन केलं, खासकरुन काईल जेमिसनने. पहिल्या इनिंगमध्ये भारताला कमीत कमी 275 रन करण्याची गरज होती. 145 वर 3 विकेट गमावल्यानंतर 217 रनवर टीम ऑल आऊट झाली, पुढे हीच गोष्ट निर्णायक ठरली,' असं संजय बांगर म्हणाले. 'परदेशामध्ये जेव्हा भारतीय टीमने कठीण परिस्थितीमध्ये मॅच जिंकली, तेव्हापासून रहाणेने शानदार खेळ केला, पण बॅट्समन म्हणून त्याला अजून तशी एकही सीरिज मिळाली नाही, ही गोष्ट अजिंक्यही मान्य करेल. तो खेळाचा उत्तम विद्यार्थी आहे, तसंच समजदारही आहे. भविष्यात त्याला अशी एखादी सीरिज मिळेल,' असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला. संजय बांगर यांनी येत्या काही काळात करुण नायरला (Karun Nair) पुन्हा एकदा टीममध्ये संधी मिळेल, अशी शक्यता बोलून दाखवली आहे. एक-दोन खराब कामगिरींमुळे करुण नायरला बाहेर करण्यात आल्याची खंतही संजय बांगर यांनी बोलून दाखवली. 'नायरला त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटचे आकडे बघून टीममध्ये जागा मिळू शकते. हनुमा विहारीही (Hanuma Vihari) चांगली गुंतवणूक आहे. त्याची आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे. यावर्षाच्या सुरुवातीला सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तो सक्षम बॅट्समन आहे, पण मधल्या फळीत बॅट्समनची रांग लागली आहे, यात करुण नायरचं नाव असू शकतं,' असं संजय बांगर यांना वाटतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, Team india

    पुढील बातम्या