मुंबई, 10 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) आवडतं खाणं म्हणजे मासे. अनेक मुलाखतींमध्ये सचिनने आपलं माशांवरचं प्रेम बोलून दाखवलं आहे. अस्सल नॉन व्हेज खाणारा सचिन तेंडुलकर बायकोच्या वाढदिवशी मात्र शुद्ध शाकाहारी झाला आहे. मुंबईतल्या श्री ठाकर भोजनालयात जाऊन सचिनने गुजराती थाळीवर ताव मारला. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) हिचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त सचिन कुटुंबासह या गुजराती भोजनालयात गेला होता. यावेळी सचिन त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मित्रपरिवार तसंच नातेवाईक होते.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर हॉटेलमधले जेवतानाचे फोटो शेयर केले आहेत. ' अंजलीच्या वाढदिवसानिमित्त श्री ठाकरमध्ये सरस गुजराती थाळीवर ताव मारला. तिचे गुज्जू जीन्स मजबूत आहेत, पण आमच्या जिन्सची बटणं या जेवणामुळे कमकूवत झाली,' असं कॅप्शन सचिनने या फोटोंना दिलं आहे. 1945 पासून हे भोजनालय मुंबईत सुरू आहे, हे ऐकून सचिनला आश्चर्याचा धक्का बसला.
अंजली तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त मुलगी साराने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंना साराने (Sara Tendulkar) इमोशनल कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
10 नोव्हेंबर 1967 साली अंजली तेंडुलकरचा जन्म झाला. अंजली तेंडुलकर पेशाने बालरोगतज्ज्ञ आहेत. 1990 साली मुंबई विमानतळावर सचिन आणि अंजली यांची पहिली भेट झाली. तेव्हा डॉक्टरी पेशात असलेल्या अंजलीला क्रिकेटबद्दल फारसं माहिती नव्हतं. सचिनला जेव्हा डेट करायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला क्रिकेट समजायला लागलं, असं अंजली एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती.
पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली यांचं लग्न झालं. यानंतर 12 ऑक्टोबर 1997 ला सचिन आणि अंजलीला कन्यारत्न प्राप्त झालं. सारा तेंडुलकरचा जन्म सहारा कप संपल्यानंतर झाला. त्यामुळे सहारा कपच्या नावावरून सचिनने मुलीचं नाव सारा ठेवलं. कर्णधार म्हणून जिंकलेली ती सचिनची पहिलीच स्पर्धा होती. यानंतर 24 सप्टेंबरला सचिन आणि अंजली यांना मुलगा झाला, त्याचं नाव अर्जुन ठेवण्यात आलं. याच आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबईने विकत घेतलं, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडवेळी अर्जुनला दुखापत झाली, त्यामुळे त्याला भारतात परतावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar