मुंबई, 8 एप्रिल : कोरोना झालेल्या महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सचिन तेंडुलकरने कोरोनावर (Sachin Tendulkar Corona) मात केली असून गुरूवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढचे काही दिवस सचिन घरातच क्वारंटाईन असेल. 27 मार्चला सचिन तेंडुलकरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्याने स्वत:ला घरातच आयसोलेट केलं होतं, पण 2 एप्रिलला सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) भाग घेतला होता. या सीरिजमध्ये सचिनने इंडिया लिजंड्सचं (India Legends) नेतृत्व केलं होतं. सचिनच्याच कॅप्टन्सीमध्ये इंडिया लिजंड्सने फायनलमध्ये श्रीलंका लिजंड्सचा (Sri Lanka Legends) पराभव केला होता. या स्पर्धेच्या काही दिवसानंतरच सचिनला कोरोनाची लागण झाली. या सीरिजमध्ये खेळणाऱ्या युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रीनाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
आयपीएलवरही कोरोनाचं संकट
दुसरीकडे आयपीएल 2021 (IPL 2021) वरही कोरोनाचं संकट आहे. शुक्रवार 9 एप्रिलपासून जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगला सुरूवात होणार आहे. पण त्याआधी खेळाडू, ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आयपीएलमध्ये जवळपास एका आठवड्यात 4 खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आरसीबीचे (RCB) देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), डॅनियल सॅम्स (Daniel Sams) आणि केकेआरचा (KKR) नितीश राणा (Nitish Rana) यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे, तर दिल्लीचा (Delhi Capitals) अक्षर पटेल (Axar Patel) मात्र सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊट आणि विकेट कीपिंग सल्लागार किरण मोरे (Kiran More) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या 11 कर्मचाऱ्यांना तसंच मुंबईत प्रसारणाची तयारी करणाऱ्या ब्रॉडकास्टिंग टीमच्या 14 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Sachin tendulkar