रायपूर, 17 मार्च: वेस्ट इंडिज लेजंड्सला नमवून इंडिया लेजंड्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंडिया लेजंड्सने वेस्ट इंडिज लेजंड्सचा (indian legends vs west indies legends) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या सेमीफायनलमध्ये (Semi Final Match) 12 धावांनी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये भारताची टक्कर कोणासोबत होणार हे 21 मार्च रोजी होणाऱ्या श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण अफ्रिका लेजंड्समध्ये होणाऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.
या सीरीजमध्ये सुरुवातीपासूनच भारताचं पारडं जड होतं. छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या शहीद वीप नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिज लेजंड्सचा कप्तान ब्रायन लाराने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी इंडिया लेजंड्सने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात 218 धावांचा डोंगर रचला होता. 218 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज लेजंड्स 6 विकेट्सच्या बदल्यात 206 धावाच करू शकली.
एक वेळ अशी होती की, वेस्ट इंडिजचा स्कोर 18.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात 200 असा होता. तेव्हा वेस्ट इंडिज लेजंड्सला 10 बॉलवर अवघ्या 19 धावांची आवश्यकता होती. यावेळी क्रिझवर ब्रायन लारा आणि नरसिंह देवनरेन हे दोघं खेळत होते. दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते, दोघांचीही विजय खेचून आणण्यासाठी धडपड सुरू होती. पण पुढच्याच बॉलवर विनय कुमारने ब्रायन लाराला क्लिन बोल्ड केलं. तर शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर देवनरेनही रन आऊट झाला. त्यामुळे इंडिया लेजंड्सने या सामन्यात बाजी मारली आणि विजय खेचून आणला.
तत्पूर्वी, युवराज सिंगने इंडिया लेजंड्सकडून खेळताना 20 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 6 षटकार आणि एक चौकार ठोकला. तर युसुफ पठाणने 20 चेंडूत नाबाद 37 धावा कुटल्या. त्यानेही 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. या दोघांनी अवघ्या 35 चेंडूत 78 धावांची धमाकेदार भागीदारी केली. इंडिया लेजेंड्सने शेवटच्या 5 षटकांत 72 धावा केल्या, तर अखेरच्या 2 षटकांत 40 धावा कुटल्या.
हे ही वाचा -VIDEO: युवराज सिंगचा मैदानातील जलवा कायम! एकाच ओव्हरमध्ये लगावले 4 उत्तुंग सिक्स
इंडिया लेजेंडच्या तिसऱ्या विकेट्सच्या रुपात सचिन तंबूत परतला. टिनो बेस्टने 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाउंड्री लाइनवर सचिनला झेलबाद केलं. सचिनने या सामन्यात 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. सचिन जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा इंडिया लेजंड्सची अवस्था तीन बाद 140 धावा अशी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news