रसेलच्या वादळात 'विराट'सेनेची धुळधाण, कोलकाता जितबो रे!

रसेलच्या वादळात 'विराट'सेनेची धुळधाण, कोलकाता जितबो रे!

आंद्रे रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांसह 48 धावा केल्या.

  • Share this:

बेंगळुरू, 05 एप्रिल : आरसीबीने पाचव्या सामन्यात केकेआरला 206 धावांचे आव्हान दिले होते. लिनच्या वेगवान खेळीनंतर आंद्रे रसेलच्या वादळी खेळीने अशक्यप्राय विजय केकेआरने सहज मिळवला. आरसीबीने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या 16 षटकांत 4 बाद 140 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 17 व्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या तुफान फटकेबाजीने सामना केकेआरने जिंकला. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील हा सलग पाचवा पराभव आहे.

सामन्यातील 17 व्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मोहम्मद सिराजने हे षटक टाकले. पहिलाच चेंडू फुल टॉस टाकला. त्यावर रसेलला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही रसेल धाव काढू शकला नाही. तिसऱा चेंडू टाकताना सिराजने बाऊन्सर टाकला. मात्र तो वाइड ठरला. यावेळी पंचांनी सिराजला ताकीद दिली होती. एकदा ताकीद दिल्यानंतरही तिसऱ्या चेंडूवर पुन्हा बाउन्सर टाकल्याने सिराजला नो बॉल दिला. या चेंडूवर रसेलने षटकार ठोकला. त्यानंतर पंचांनी त्याला पुढचं षटक टाकता येणार नसल्याचे सांगत त्याबद्दल विराटला कल्पना दिली. उर्वरीत षटक टाकण्यासाठी चेंडू स्टोइनसकडे सोपवला. त्या चेंडूवरही रसेलने षटकार ठोकला. हा चेंडूच सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

सामन्यातील 19 व्या षटकात तब्बल 29 धावा कुटल्या. पहिल्या चेंडूवर शुभमन गिलने एक धाव काढली. त्यानंतर स्ट्राइकला आलेल्या रसेलने अक्षरश: धुलाई केली. पुढच्या सलग तीन चेंडूवर षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार खेचत या षटकात 29 धावा काढत बरोबरी साधली. शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव काढून केकेआरने विजय मिळवला. रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारासह 48 धावा केल्या.

दरम्यान, पहिल्याच षटकात 17 धावा काढल्या. दुसऱ्या षटकातील 5 व्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात सुनिल नरेन झेलबाद झाला. त्यानंतर रॉबीन उथप्पा मैदानात आला. त्याने ख्रिस लिनच्या साथीने धावफलक हलता ठेवला. उथप्पाला नेगीने साउथीकडे झेल देण्यास भाग पाडले. उथप्पाने 25 चेंडूत ३३ धावांची खेळी केली. उथप्पा आणि लिनने 65 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ख्रिस लिनने एका बाजूने फटकेबाजी करत 31 चेंडूत 4 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकारांच्या सहाय्याने 43 धावा केल्या. त्याला नेगीने त्रिफळाचित केलं. तेव्हा संघाच्या 108 धावा झाल्या होत्या.

तत्पूर्वी, चिन्नास्वामी स्टेडियमवर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने केकेआरला 206 धावांचे आव्हान दिलं. कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. दोघांनी 7.5 षटकांत 64 धावांची भागिदारी केली. नितीश राणाने पार्थिव पटेलला पायचित करून ही जोडी फोडली. त्याने 24 चेंडूत 25 धावा केल्या. या बळावर आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 205 धावा केल्या.

पार्थिव पटेलनंतर मैदानात आलेल्या एबी डीव्हिलियर्सने कोहलीसोबत तुफान फटकेबाजी केली. दोघांनी 108 धावांची भागिदारी केली. कोहलीने 49 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारासह 84 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. दुसऱ्या बाजूला डिव्हीलियर्सने 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याच्या 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विराटनंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोइनसने 13 चेंडूत 28 धावा केल्या.

VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले

First published: April 5, 2019, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading