मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती (Test Retirement) घेणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. जडेजाचे चाहते आणि भारतीय क्रिकेट रसिकांना यामुळे धक्का बसला होता, पण आता स्वत: जडेजाने यावर भाष्य केलं आहे. जडेजाने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले, यात त्याने सगळ्या चर्चांना उत्तर दिलं आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमधलं आपलं करियर जास्त काळ वाढवण्यासाठी जडेजा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो, असं वृत्त एका दैनिकाने दिलं होतं. जडेजाने हे वृत्त फेटाळून लावत या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं आहे.
जडेजाने बुधवारी सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले. खोटे मित्र अफवांवर विश्वास ठेवतात आणि खरे मित्र तुमच्यावर, असं कॅप्शन असणारा फोटो त्याने ट्वीट केला. यानंतर त्याने स्वत:चा टेस्ट क्रिकेटमधला फोटो शेयर केला आणि दूरपर्यंत जायचं आहे, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं. जडेजाच्या या फोटोवरून तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला जडेजा सिडनी टेस्टवेळी दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावं लागलं होतं. यानंतर मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये झालेल्या टेस्टवेळीही त्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो मुंबईमधली दुसरी टेस्ट खेळला नाही. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेल्या टेस्ट टीममध्येही जडेजाची याच दुखापतीमुळे निवड होऊ शकली नाही.
टेस्ट क्रिकेटमध्ये जडेजाने 57 सामन्यांमध्ये 33.76 च्या सरासरीने 2,195 रन केल्या, यात एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय त्यान 2.41 च्या सरासरीने 232 विकेटही घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 200 विकेट घेणारा तो पहिला डावखुरा बॉलर ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravindra jadeja, Team india