दुबई 30 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध शानदार बॉलिंग करून सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)ला विजय मिळवून देणाऱ्या राशीद खान (Rashid Khan)ला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. सनरायजर्स हैदराबादचा यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मोसमातला पहिलाच विजय होता.
मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर राशीद खानने हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांना समर्पित केला. सनरायजर्सनी पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 162 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा 15 रननी पराभव झाला. राशीद खानने 4 ओव्हरमध्ये 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या.
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारतना राशीद खान भावूक झाला. 'मागचं दीड वर्ष माझ्यासाठी कठीण राहिलं. पहिले माझ्या वडिलांचं निधन झालं, यानंतर 3-4 महिन्यांमध्ये मी आईपण गमावली. हा पुरस्कार त्या दोघांचा आहे. आई माझी प्रशंसक होती, जेव्हा पुरस्कार मिळायचा, तेव्हा रात्रभर ती माझ्याशी बोलायची,' असं राशीद खान म्हणाला.
'चांगली कामगिरी करण्याचा दबाव मी कधीही घेत नाही. डोकं शांत ठेवून मी खेळतो आणि गोष्टी सोप्या ठेवतो. कर्णधाराने कायमच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला नेहमीच माझ्या हिशोबाने बॉलिंगची संधी मिळाली आहे,' अशी प्रतिक्रिया राशीद खानने दिली.
वॉर्नरकडून टीमचं कौतुक
सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोसमाच्या पहिल्या विजयानंतर टीमचं कौतुक केलं आहे. 'मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याची कमतरता भरून काढणं गरजेचं होतं. अभिषेकने चांगली बॉलिंग केली. आम्ही शेवटच्या काही ओव्हरमधल्या बॉलिंगसाठी जास्त मेहनत केली आहे. आज सगळ्यांनीच चांगली कामगिरी केली,' अशी कौतुकाची थाप वॉर्नरने मारली.
वाचा - काश्मीरच्या खेळाडूची IPL मध्ये एण्ट्री, पठाण म्हणतो, 'मोठा ऑलराऊंडर होईल'
जॉनी बेयरस्टोसोबत अर्धशतकीय पार्टनरशीप करणारा वॉर्नर म्हणाला, 'आम्ही रन काढण्यासाठी चांगले धावलो. जेव्हा फोर-सिक्स येत नव्हत्या, तेव्हा आम्ही पळून रन काढत राहिलो.' तर खेळपट्टीचा अंदाज आमच्यापेक्षा हैदराबादच्या टीमला चांगला आल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं. 'या मॅचमध्ये दव महत्त्वाची भूमिका बजावेल, असं आम्हाला वाटत होतं, पण असं झालं नाही. आम्हाला कोणतीही कारणं द्यायची नाहीत. मैदानाच्या आकाराचा फायदा घेऊन आम्ही जलद रन केल्या नाहीत. पुढच्या वेळी अशी चूक करणार नाही,' असं वक्तव्य श्रेयस अय्यरने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.