ख्राईस्टचर्च, 28 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु आहे. पण भारताच्या यंदाच्या अख्ख्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसानं मात्र पुरता गोंधळ घातला आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत केवळ एकच मॅच पूर्ण खेळवण्यात आली. तीच मॅच जिंकून भारत टी20 मालिकेत सरस ठरला. पण वन डेत पहिली मॅच जिंकून यजमान संघानं आघाडी घेतली. तर हॅमिल्टनची दुसरी वन डे पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे सध्या या मालिकेत केन विल्यमसनची न्यूझीलंड 1-0 अशा फरकानं आघाडीवर आहे. भारताला ही मालिका जिंकण्याची संधी नाही. पण असं असलं तरी ही मालिका गमवायची नसेल तर टीम इंडियाला ख्राईस्टचर्चची तिसरी वन डे जिंकावी लागेल. पण तसं होणं सध्या मुश्किल आहे.
ख्राईस्टचर्चमध्येही पाऊस?
तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्याआधी भारतीय फॅन्ससाठी एक निराश करणारी बातमी आहे. येत्या बुधवारी उभय संघात ख्राईस्टचर्चमध्ये हा सामना खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पण याच दिवशी ख्राईस्टचर्चमध्ये पावसाची शक्यता 70 टक्के वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तिसरी वन डे जर झाली नाही तर यजमान न्यूझीलंड ही मालिका 1-0 अशा आघाडीसह जिंकेल.
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? 'या' खास अॅक्शनमुळे झाली होती चर्चा...
हॅमिल्टन वन डे ठरणार निर्णायक?
हॅमिल्टनच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडनं भारताला 7 विकेट्सनी हरवलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियानं चांगली सुरुवात केली होती. पण पावसामुळे केवळ 12.5 ओव्हर्सच्या खेळानंतर सामना थांबवण्यात आला. आता तिसरी वन डेही पावसामुळे झाली नाही तर हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडनं मिळवलेला विजय निर्णायक ठरणार आहे.
भारत वि. न्यूझीलंड, तिसरी वन डे
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
30 नोव्हेंबर, भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वा.
डीडी स्पोर्ट्स, अॅमेझॉन प्राईमवर थेट प्रक्षेपण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india