मुंबई, 12 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचे (Team India Coach) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) याला या पदासाठी विचारणा करण्यात आली, पण द्रविडने बीसीसीआयच्या (BCCI) या ऑफरला नकार दिल्याचं वृत्त आहे.
17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. रवी शास्त्री यांची ही टीम इंडियाचे कोच म्हणून अखेरची स्पर्धा असेल. शास्त्री यांच्यासह बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर हेदेखील टीमची साथ सोडण्याची शक्यता आहे. टीमचे स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच निक वेब यांनीही आपण टी-20 वर्ल्ड कपनंतर आपलं पद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राहुल द्रविड हा सध्या एनसीएचा प्रमुख आहे, तसंच भारताची अंडर-19 टीम आणि इंडिया ए टीमनाही तो प्रशिक्षण देतो. सीनियर टीमना कोचिंग करण्याऐवजी राहुल द्रविड युवा खेळाडूंना तयार करण्यात इच्छुक आहे. त्यामुळे याआधीही द्रविडने टीम इंडियाच्या कोचिंगसाठी नकार दिला होता. 2016 आणि 2017 साली बीसीसीआयने द्रविडला टीम इंडियाच्या कोचिंगबाबत विचारणा केली होती.
एनसीए आणि अंडर-19 मध्ये राहुल द्रविडने अनेक युवा खेळाडूंना तयार केलं, ज्याचा फायदा टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होत आहे. गेल्या काही काळामध्ये टीम इंडियाची बेंच स्ट्रेन्थही कमालीची वाढली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच खेळाडूही उपलब्ध झाले आहेत.
2018 साली द्रविड टीम इंडियाचा बॅटिंग सल्लागार होता, तसंच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही द्रविडने मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू आणि कोचिंग स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे राहुल द्रविडने ही जबाबदारी पार पाडली होती.
या आठवड्याच्या अखेरीस बीसीसीआय टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठीची जाहिरात प्रसिद्ध करेल, यानंतर इच्छुक या पदासाठी अर्ज करतील. यातल्या काहींची नाव शॉर्ट लिस्ट केली जातील आणि मग त्यांची मुलाखत क्रिकेट सल्लागार समिती घेईल. क्रिकेट सल्लागार समितीने नव्या प्रशिक्षकाबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर बीसीसीआय या नावाची घोषणा करेल. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी भारताला नवा कोच मिळेल, अशी माहिती बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिली आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांचं नाव समोर येत आहे. फॉक्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार मूडीने टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोच होण्यासाठी मूडी अर्जही करणार आहे. तसंच या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या नावाची देखील चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Rahul dravid, Team india